बाळू बोडके,कार्तिक काटे यांचे प्रेक्षणीय विजय, मजगाव कुस्ती मैदानात 25 हजार शौकिनांची उपस्थिती
बेळगाव / मजगाव : मजगाव येथे ब्रम्हदेव कुस्तीगीर संघटना आयोजित कलमेश्वर यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या शिवाने अवघ्या सात मिनिटांत इराणच्या सोहेलला नाकपट्टी लावून एकलांगी डावावर तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्राच्या बाळू बोडकेने विक्रांत कुमार-दिल्लीला झोळी डावावरती पराभव करुन उपस्थित 25 हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती महाराष्ट्राचा उगवता मल्ल शिवा महाराष्ट्र-पुणे व आंतरराष्ट्रीय पदक विजेता इराणचा सोहेल ही कुस्ती अहमद मजगावकर, कृष्णा बिंदले, उद्यमबाग पोलीस स्थानकचे निरीक्षक किरण होनकट्टी, विराट हॉटेलचे मालक कपिल भोसले व ब्रम्हलिंग कुस्तीगीर संघटनेच्यावतीने ही कुस्ती लावण्यात आली. पहिल्याच मिनिटाला शिवा महाराष्ट्राने एकेरीपट काढून सोहेलला घिस्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण सोहेलने त्यातून सुटका करुन घेतली. तिसऱ्या मिनिटाला पुन्हा शिवाने एकेरीपट काढून पायाला आकडी लावून सोहेलवर कब्जा मिळविला. पण खालुन दशरंग फिरून सोहेलने शिवावर कब्जा मिळविला. पण शिवाने खालुन डंकी मारुन त्यातून सुटका करुन घेतली. चौथ्या मिनिटाला शिवाने एकेरीपट काढून छडी टांगेवरती सोहेलला चित करण्याचा प्रयत्न केला. सातव्या मिनिटाला एकेरीपट काढून सोहेलला खाली घेत पायाला एकलांगी बांधून नाकपट्टी लावित एकलांगी डावावरती अस्मान दाखवून उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी सह्याद्री कुस्ती संकुलनचा मल्ल बाळू बोडके ही कुस्ती जय भारत फौंडेशन उद्यमबाग, कपिल भोसले व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला बाळूने एकेरीपट काढून विक्रांतला खाली घेतले. पण विक्रांतने खालुन डंकी मारुन बाळूवरती कब्जा मिळविला व घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून बाळूने सुटका करुन घेतली. दुसऱ्या मिनिटाला विक्रांतने दुहेरीपट काढून बाळूवरती कब्जा मिळविला व एकलांगी भरण्याचा प्रयत्न केला. पण तितक्याच चलाखीने पुन्हा बाळूने डंकी मारुन सुटका करुन घेतली. चौथ्या मिनिटाला बाळू बोडकेने एकेरीपट काढून विक्रांतला कब्जा मिळवित घुटना ठेवण्याचे भासवत झोळी बांधून झोळी डावावरती प्रेक्षणीय विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व राष्ट्रीय पदक विजेता द. अमेरिका अॅबेनोर देशाचा रिकॉर्डो सॅटिनो यांच्यातील कुस्ती जय भारत फौंडेशन, कृष्णा बिंदले व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्याच मिनिटाला कार्तिकने एकेरीपट काढून पायाला एकलांगी बांधून चित करण्याचा प्रयत्न केला. पण तितक्याच चलाखीने रिकॉर्डोने त्यातून सुटका करुन घेतली. लागलीच दुसऱ्या मिनिटाला पुन्हा कार्तिकने एकेरीपट काढून एकलांगी बांधून चित करण्याचा प्रयत्न करताना खालुन डंकी मारुन रिकॉर्डोने कार्तिकवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला व घिस्सा मारण्याचा प्रयत्न करत असताना खालुन डंकी मारत रिकॉर्डोला कार्तिकने चारीमुंड्या चित करुन उपस्थित कुस्ती शौकिनांकडून वाहवा मिळविली.

चौथ्या क्रमांकाची कुस्ती श्रीमंत भोसले-इचलकरंजी व शुभम कोळेकर-गंगावेस ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली. पण वेळेनंतर ही कुस्ती गुणावर घेण्याचा निर्णय पंचानी घेतला. त्यामध्ये श्रीमंत भोसलेने एकेरीपट काढून शुभम कोळेकरवर ताबा मिळवून गुण मिळवित विजय मिळविला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्ती आकाराम कोलेकर-गंगावेस व कामेश पाटील-कंग्राळी या कुस्तीत कामेशला दुखापत झाल्याने आकारामला विजयी घोषित करण्यात आले. सहाव्या क्रमांकाची कुस्ती सौरभ काकडे-पुणे व प्रकाश इंगळगी-घोडगेरी ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत शिवा दड्डीने करण हरियाणाचा सवारी डावावरती पराभव केला. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत विक्रम -शिनोळीने यश जाधवला घुटण्यावर पराभव केले. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ पाटील-कंग्राळीने यश चव्हाण-पुणेचा पायाला एकलांगी भरवून एकेरी हाताचा कस चढवित विजय मिळविला. दहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रथमेश हट्टीकर-कंग्राळी व अश्पाक तांबोली ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली.

त्याच प्रमाणे महेश तीर्थकुंडये छडी टांगेवर, पृथ्वीराज पाटील एकलांगीवर, माऊली तिपुगडे कलाजंगवर, सागर जाफरवाडी-बगली डावावर, हणमंत घटप्रभा हप्ते डावावरती, हर्ष-कंग्राळी गदेलोटवर, महांतेश संतीबस्तवाडने निकाली डाववर विजय मिळविला. तसेच बाळु मजगाव, यश-कोरे गल्ली, हर्ष मजगाव, राहुल घोडगेरी, शंकर तीर्थकुंडये, अफान मजगाव, आदर्श मजगाव, आनंद वडगाव, सुहास खादरवाडी, निखिल शिनोळी, करण खादरवाडी आदींनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. महिलांच्या प्रमुख कुस्तीत राधिका संतीबस्तवाडने ऋतुजा रावळवर एकचाक डावावरती पराभव केला. तनुजा खानापूरने अक्षरा येळ्ळूरचा घिस्यावर, शीतल सुतारने आदिती कोरेवर एकलांगीवर, रिया संतीबस्तवाडने अंजली शिंदेचा तर समिता बिर्जे श्रुती खादरवाडी, सुकन्या रंगधोळी, स्वयनी खादरवाडी या कुस्ता बरोबरीत राहिल्या. प्रभा खादरवाडीने विजय मिळविला. महिलांच्या आकर्षक कुस्तीत मनस्वी जायन्नाचे-मजगाव हिने समिक्षा खादरवाडीचा घिस्यावर पराभव करुन चषक पटकविला.
गदेंच्या कुस्तीत रिदांत काकतकर-मजगावने रितेश यल्लारी-हिंडलग्याचा एकलांगीवर, मौलाली मजगावने रोहीत माचिगडचा घिस्यावरती तर अफान मजगावने संतोष शिनोळीचा एकचाक डावावरती पराभव करुन गदेचे मानकरी ठरले. आखाड्याचे पंच म्हणून सुधीर बिर्जे, कृष्णा पाटील-कंग्राळी, चेतन बुद्दन्नावर, गणपत बन्नोसी, बाळाराम पाटील, शिवाजी पाटील, राजू कडोली, प्रकाश तीर्थकुंडये, बसू घोडगेरी, ए. जी. मंतुर्गे, प्रशांत कंग्राळी, हणमंत गुरव, नारायण मुचंडी, पिराजी मुचंडी, अतुल शिरोळे, नवीन मुतगा, प्रकाश मुधोळ, दुंडेश मुरगनट्टी आदींनी काम पाहिले. प्रारंभी हनुमान मूर्तीचे पूजन कुस्तीगीर कमिटी व देवस्थान पंच कमिटी यांच्या हस्ते करण्यात आले. आखाड्याचे उद्घाटन फित कापून ज्येष्ठ मल्लांकडून करण्यात आले. शिवाजी पट्टण व युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्तीचे समालोचन कृष्णकांत चौगुले-राशिवडे यांनी केले तर कृष्णा बुंदले-तासगाव व सहकाऱ्यांसह रणालगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.

20 वर्षांनंतर भरले पुन्हा मजगाव मैदान
मजगाव येथे गेले 20 वर्षे कुस्तीचे मैदान काही कारणास्तव थांबविण्यात आले होते. मात्र यावर्षी या मैदानाला सुरूवात करण्यात आले. यावर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान भरविण्यात आले. नेटके नियोजन करुन कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. सध्याच्या कुस्तीगीर संघटनेने गेले दोन महिने मैदान तयार करण्यासाठी चांगलेच कष्ट उपसले. मैदान तयार करण्यापासून ते मैदान जोडण्यापर्यंत सर्व कसरत नवीन कुस्तीगीर संघटनेने केली. त्यामुळे बुधवारी झालेल्या कुस्त्यांमुळे त्यांचे श्रम साफल्य झाल्याचे दिसून आले.









