भाविकांची मोठी गर्दी : दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : देवाच्या नौकानयन फेरीला प्रारंभ
बेळगाव : महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्रप्रदेश व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सोगल येथे मकरसंक्रांतीनिमित्त भाविकांनी सोमवारी धबधब्यावर पुण्यस्नान केले. मकरसंक्रांतीनिमित्त रविवार व सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होती. विविध भागातून आलेल्या भाविकांनी धबधब्यावर पुण्यस्नान केले. त्यानंतर त्यांनी शिवपार्वतीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील डोहात देवाचे नौकानयन घडविण्यात आले. जत्रोत्सवानिमित्त विविध फुलांनी मंदिर सजविण्यात आले होते. चांदीच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढून तबकात स्थापना करण्यात आली. सोमवारी सायंकाळी गुरुमडिवाळेश्वर मठाचे गंगाधरस्वामीजी, बैलहोंगल-होसूर मुरुसावीर मठाचे प्रभू नीलकंठस्वामीजी, नरेंद्र येथील संगमेशस्वामीजींनी पूजा करून देवाच्या नौकानयन फेरीला प्रारंभ केला. मंदिराचे पुरोहित निंगय्या पुजेरी व गुरुस्वामी होसपेटीमठ यांनी मंत्रघोष केला. यावेळी त्यांनी भाविकांच्यावतीने गाऱ्हाणे घातले. बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, ट्रस्टचे अध्यक्ष वीरनगौडा संगन्नावर यांच्यासह प्रशासकीय मंडळाचे सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मकरसंक्रांतीनिमित्त शिवपार्वतीची विशेष पूजा बांधण्यात आली होती. सोमवारी सकाळपासूनच धार्मिक विधी सुरू होते. यावेळी भाविकांनी तीर्थक्षेत्रावर भोजनाचा योग साधला.









