क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
दिल्ली येथे होणाऱया एशियन पॅरा ट्रक सायकलिंग स्पर्धेसाठी चंदरगी स्कूलचा विद्यार्थी बसवराज होरड्डी याची निवड झाली असून, त्याला सोको संस्था व चंदरगी क्रीडा शाळेने मदतीचा हात दिला आहे.
18 ते 22 जून दरम्यान दिल्ली येथे होणाऱया पॅरा एशियन ट्रक स्पर्धेसाठी बसवराज होरड्डीची निवड झाली आहे. पण त्याच्याकडे अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध नसल्याचे सोको संस्थेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला मदत दिली आहे. बसवराजला शाळेत प्रशिक्षण देण्याबरोबर सर्व क्रीडासामुग्री देण्याचे मान्य केले आहे. शाळेचे सायकलिंग प्रशिक्षक भिमशी विजयनगर या प्रतिभावान खेळाडूला प्रशिक्षण देत आहेत. आगामी स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करून भारताचे व कर्नाटकाचे नाव उज्ज्वल करेल, अशी आशा व्यक्त करून सोको संस्थेचे संस्थापक एस. एस. कलुती, अध्यक्ष बी. आर. पाटील व उपाध्यक्ष राजेश्वरी यादवाड व संचालक मंडळांनी बसवराजला शुभेच्छा दिल्या.









