पोलीस महानिरीक्षक एन. सतीशकुमार यांचे आवाहन : पोलीस ध्वजदिन उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
समाजरक्षणार्थ पोलीस दलाचे आणि पोलिसांचे योगदान महत्त्वाचे आहे. आपल्या कर्तव्याच्या काळात कुटुंबाकडेही लक्ष न देता पोलीस जनतेची सेवा करतात. समाजानेही पोलिसांकडे आदराने पाहावे, असे आवाहन बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एन. सतीशकुमार यांनी रविवारी केले.
जिल्हा पोलीस परेड ग्राऊंडवर पोलीस ध्वज दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी वरील आवाहन केले. समाजात कायदा, सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी पोलिसांचे योगदान महत्त्वाचे आहे. निवृत्तीनंतर अधिकारी व पोलिसांशी सध्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी आदबीने वागावे. जेणेकरून तुमच्यासोबत आम्ही आहोत, हा संदेश त्यांना देण्याची गरज आहे, असे पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त आरएसआय एम. बी. मुष्टगी, निवृत्त एआरएसआय ए. ए. किल्लेदार उपस्थित होते. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदींसह पोलीस अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी आकर्षक पथसंचलनही झाले.









