वैफल्यग्रस्त मन:स्थितीमुळे टोकाचे पाऊल : आत्महत्या-अपघात भासवून खुनाचेही प्रकार, वाढती व्यसनाधीनताही कारणीभूत
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात आत्महत्यांचे प्रकार सुरूच आहेत. गेल्या अकरा महिन्यांत 397 जणांचा अनैसर्गिक मृत्यू झाला असून यामध्ये 172 जणांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या प्रकरणांमुळे चिंतेत वाढ झाली आहे. मानसिक ताणतणाव, आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह, मटका, जुगार, ऑनलाईन गेमिंगचा नाद आदींमुळे आत्महत्येच्या प्रकारात वाढ होत चालली आहे. गेल्या तीन वर्षांची आकडेवारी लक्षात घेता 1 जानेवारी 2022 पासून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत बेळगावात 1206 जणांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 588 जणांनी आत्महत्या केली आहे. विष पिऊन, विहिरीत उडी टाकून, स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या करणाऱ्यांपेक्षा गळफास घेऊन आपले जीवन संपविणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
गेल्या वर्षभरात तर आत्महत्या, अपघात भासवून खून केल्याची उदाहरणेही आहेत. एपीएमसी व माळमारुती पोलीस स्थानकात या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांचा छडा लावला आहे. सामान्य नागरिकांपासून मोठ्या उद्योजकापर्यंत गेल्या अकरा महिन्यात अनेकांनी आपले जीवन संपविले आहे. 2022 मध्ये 206 जणांनी तर 2023 मध्ये 210 जणांनी आत्महत्या केली आहे. चालू वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत 172 जणांनी आपले जीवन संपविले आहे. एकंदर अनैसर्गिक मृत्यू प्रकरणे लक्षात घेता यंदा या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. 2022 मध्ये 405 जणांचा तर 2023 मध्ये 404 जणांचा अनैसर्गिक मृत्यू झाला होता. चालू वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत 397 जणांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे. डिसेंबरची आकडेवारी जमा केल्यास मागील वर्षापेक्षा यंदा अनैसर्गिक मृत्यू प्रकरणात वाढ झाल्याचे दिसून येणार आहे.
जीवनाला कंटाळून अनेक जण आत्महत्येचा मार्ग पत्करतात. आत्महत्या करणे महापाप आहे, असे महात्मा गांधीजींनी सांगितले आहे. कायद्यानेही तो गुन्हा आहे. तरीही सर्व मार्ग बंद झाले की माणूस आत्महत्येचा मार्ग पत्करतो. कर्नाटकाची राजधानी बेंगळूरमधील घटना लक्षात घेता यंदा चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक अडचणी, अनैतिक संबंध, व्यापार-उद्योगातील नुकसान, कौटुंबिक समस्या, आजार, व्यसनाधीनता, त्यामुळे येणारी मानसिक अस्वस्थता, कर्जबाजारीपणा अशा अनेक कारणांमुळे आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. अलीकडे बेटिंग व ऑनलाईन रमीमुळे आर्थिक फटका बसल्यानंतर झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे अनेकांनी आपले जीवन संपविले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही जुगार, रमी त्यामुळे घडलेल्या आत्महत्येच्या प्रकारांवर चर्चा झाली आहे. अशा पद्धतीने होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज विधिमंडळात व्यक्त करण्यात आली आहे.
विणकरांची संख्याही मोठी
गेल्या वर्षभरात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विणकरांची संख्याही मोठी आहे. परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा अभ्यास न झेपल्यामुळे विद्यार्थ्यांनीही आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. गेल्या अकरा महिन्यांत 29 जणांनी विष पिऊन तर 11 जणांनी विहीर, तलाव, नदीत उडी टाकून आत्महत्या केली आहे. तर तिघा जणांनी पेटवून घेऊन जीवन संपविले आहे. 127 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 67 अनैसर्गिक मृत्यू
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 67 अनैसर्गिक मृत्यू प्रकरणांची नोंद झाली आहे. तर उद्यमबाग पोलीस स्थानकात सर्वात कमी 2 अनैसर्गिक मृत्यूंची नोंद झाली आहे. अपघाती भाजल्यामुळे 16 जणांचा तर अपघाताने विष प्याल्याने 48 जणांचा, पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे 79 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस दफ्तरी नोंद आहे. आत्महत्येच्या घटना वाढल्या की त्या थोपविण्यासाठी चर्चा सुरू होते. सामाजिक संघटना यासाठी पुढे येतात. मात्र, प्रयत्न तोकडे पडतात. आत्महत्येचे प्रकार सुरूच असतात. या आकडेवारीत रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांचा समावेश नाही.
आत्महत्येला इतर कारणांसह मनेवैज्ञानिक कारणेही कारणीभूत
स्वीडनमधील करोलिन्स्का इन्स्टिट्यूटने 2012 मध्ये आत्महत्या प्रकरणांसंबंधी एक संशोधन केले होते. आत्महत्येला इतर कारणांबरोबरच मनेवैज्ञानिक कारणेही असल्याचे या संशोधनात आढळून आले होते. सृजनशील व्यक्ती अधिक संवेदनशील असतात. एखाद्या घटनेनंतर ते लगेच ताणतणावाखाली येतात. मानसिक संतुलन बिघडले की भीती, भ्रांती व खिन्नता वाढते. त्यामुळे व्यसनाधीनता वाढते, असे या संशोधनाने स्पष्ट केले होते. बेळगाव येथील आत्महत्या प्रकरणे लक्षात घेता प्रेमवैफल्य, अनैतिक संबंध, आर्थिक अडचणी, व्यापारातील नुकसान, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक समस्या, मटका, जुगार, ऑनलाईन रमीच्या नादी लागून आपली सर्व मालमत्ता गमावणे, बेटिंगमध्ये केलेली गुंतवणूक आदी प्रमुख कारणे आहेत.









