पुणे / प्रतिनिधी :
समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोन सूत्रांभोवतीच देशाची राज्यघटना विणलेली आहे. त्यामुळे समाजवादी विचारांना मूठमाती देण्याचा सरकारचा वा कोणत्याही पक्षाचा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही. समाजवादी विचारसरणी पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
ज्येष्ठ समाजवादी नेते स्व. भाई वैद्य यांच्या जयंतीनिमित्त ज्ञान फौंडेशनतर्फे ‘लोकनेते भाई वैद्य स्मृती समाजसेवा पुरस्कार’ रत्नागिरी येथील ज्येष्ठ समाजसेवक अब्दुला काका उर्फ बाळासाहेब पाटणकर यांना, तर ‘लोकनेते भाई वैद्य स्मृती पत्रकारिता पुरस्कार’ कुर्डूवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांना डॉ. सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. त्या वेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. आरोग्य सेनेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, महावितरण, पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, ज्ञान फौंडेशनेचे अध्यक्ष मनोहर कोलते आदी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, आज समाजवाद इतिहासजमा झाल्यासारखी स्थिती आहे. किंबहुना, आजच्या काळात पुरोगामी वा समाजवादी विचाराची अधिक गरज आहे. मुळात भारतीय राज्यघटनाच समाजवाद व धर्मनिरपेक्षता या दोन सूत्रांभोवती विणली गेलेली आहे. त्यामुळे समाजवाद इतिहासजमा होऊ शकणार नाही. या विचाराला मूठमाती देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, कोणताही पक्ष वा सरकार समाजवादी विचार नष्ट करू शकत नाही. हा विचार पुन्हा उभारी घेईल. सेक्युलर समाजवाद हा भारतासाठी आवश्यकच असून, या विचारांचा जागर व्हायला हवा.
आजचे हिंदुत्ववादी हे खोटे आहेत. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांचे हिंदुत्व हे खरे व सर्वसमावेशक आहे. सध्या हिंदुत्वाच्या नावाखाली वेगळी मांडणी केली जात आहे. प्रश्नही बंद व उत्तराचा शोधही बंद, अशी आजमितीला देशाची अवस्था आहे. हे घातक आहे. चांगुलपणा दुर्मिळ झाला आहे. करंटेपणा वाढला आहे. भ्रष्ट, व्यभिचारी वृत्ती वाढली असून, मानवतावादापुढे आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा काळात बाळासाहेब पाटणकर व अरुण कोरे यांचे काम दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. आज पत्रकारांनी लेखण्या गहाण टाकल्या आहेत. सत्यनिष्ठ पत्रकारिता लोप पावत आहे. चौथा स्तंभ अशाप्रकारे मृत्यूपंथाला लागणे, हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.








