जि. पं. सीईओ राहुल शिंदे : 15 जणांचे रक्तदान
बेळगाव : जायंट्सचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. कै. नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त जायंट्स मेनच्यावतीने झालेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी शिंदे बोलत होते. केएलई हॉस्पिटलच्या रक्तपेढीत शिबिर झाले. जि. पं. सीईओ राहुल शिंदे व आयपीएस अधिकारी अनुपम जैन यांच्या हस्ते नाना चुडासमा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरूवात करण्यात आली. यावेळी जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील व जायंट्सचे सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील म्हणाले, रक्त उत्पादन करता येत नाही. गरजू रुग्णांना सक्षक्त रक्तदात्यांकडूनच रक्त मिळविणे गरजेचे असते. त्यामुळे जायंट्सतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. शिबिरामध्ये 15 जणांनी रक्तदान केले. मदन बामणे, संजय पाटील, प्रदीप चव्हाण, राहुल बेलवलकर, धनराज जाधव, अशोक हलगेकर, मुकुंद महागांवकर आदीनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.









