वृत्तसंस्था/ मुंबई
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटाच्या भारतातील जागतिक व्यवसाय समूहाची धुरा आता विकास पुरोहीत यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतातील समूहाचे मुख्य म्हणून ते कामगिरी बजावणार असून धोरण व इतर विकासात्मक कार्याची जबाबदारी ते आगामी काळात पाहणार आहेत. पुरोहीत हे याआधी टाटा क्लीकचे सीईओ होते. ते यापुढे मेटा इंडियाच्या जाहिरात व्यवसायाचे मुख्य व संचालक अरुण श्रीनिवास यांना माहिती देतील.
याप्रसंगी बोलताना अरुण श्रीनिवास म्हणाले की, विकास पुरोहीत यांचे आपण कंपनीत स्वागत करतो. त्यांची आगामी काळातील भूमिका कंपनीच्या विकासासाठी महत्त्वाची असणार आहे. भारताच्या आर्थिक विकासात व डिजिटल जाहिरातीसाठी आवश्यक पोषक वातावरण तयार करण्यासाठी त्यांचे कार्य मौलीक ठरेल.
काय असणार जबाबदारी
पुरोहित यांना आगामी काळात धोरणात्मक भागीदारीसाटी देशातील मोठय़ा आघाडीवरच्या ब्रँडस आणि एजन्सींचा पाठपुरावा करुन मेटाच्या महसुलात वाढ करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. डिजिटल जाहिरातींसाठी मीडियासह इतर माध्यमातून प्रयत्न करण्याचे नियोजन त्यांना करावे लागणार आहे. मेटाचा देशातील सर्वात मोठा व्यवसाय व एजन्सीच्या कार्यावर यांना देखरेख ठेवावी लागणार आहे.









