पणजी : भारतीय जनता पार्टीतफ्xढ भाजपाच्या स्थापना दिनापासून म्हणजेच गुरुवार दि. 6 ते 14 एप्रिल अशा 9 दिवसांमध्ये गोव्यात सामाजिक न्याय सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण गोवाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे. प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पणजीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. भाजपाचे महासचिव दामू नाईक तसेच या संपूर्ण कार्यक्रमाची ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे ते पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोरख मांद्रेकर हेही यावेळी उपस्थित होते.
सावंत सरकारचे अभिनंदन
राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे व गोव्यातील शेती संरक्षीत ठेवण्यासाठी गोवा सरकारने जे गोवा कृषी विधेयक राज्य विधानसभेत संमत केले आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारचे अभिनंदनही यावेळी करण्यात आले. हा कायदा नेमका काय आहे याविषयी जनतेमध्ये जागृती करून जनतेला समजावून सांगितला जाईल, असेही तानावडे म्हणाले.
आंबेडकर जयंतीदिनी समारोप
आंबेडकर जयंती दिनी सामाजिक न्याय सप्ताहाचा समारोप होईल. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजहिताची ध्येय धोरण राबवून जनतेमध्ये जागृती निर्माण केली जाईल. यासाठी राज्यपातळीवर समिती स्थापन करण्यात आली असून या समितीद्वारे विविध उपक्रम राबविले जातील. यावेळी सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला. भाजपचा महिला मोर्चा, युवा मोर्चा व अनेक सहयोगी विभागातफ्xढ संपूर्ण गोव्यात ही मोहिम राबविली जाणार आहे.









