राज्य सरकारकडून नवी मार्गसूची जारी
खबरदारी
- स्वतःच्या वाहनाबरोबरच सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये मास्कसक्ती
- मास्कसक्ती अंमलबजावणीचे अधिकार पोलीस, मार्शलना
- कोरोनाची लक्षणे असणाऱयांना चाचणी, होमआयसोलेशनची सक्ती
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असून दिवसाला 400 पेक्षा अधिक रुग्णांची भर पडत आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारने खबरदारी म्हणून नवी मार्गसूची जारी केली आहे.
त्यानुसार राज्यात सार्वजनिक ठिकाणे, सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालनही करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची लक्षणे असणाऱयांना कोविड चाचणी करावी लागणार असून अहवाल येईपर्यंत त्यांना होमआयसोलेशन व्हावे लागणार आहे.
चार दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सर्व जिल्हय़ांमधील कोरोना परिस्थितीचा अहवाल देण्याची सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱयांना केली होती. अहवाल आल्यानंतर राज्यात कोरोना नियंत्रणासाठी नियम लागू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार खबरदारी म्हणून मास्कसक्तीसह विविध प्रकारचे नियम लागू करण्यात आले आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे आयुक्त डी. रणदीप यांनी शुक्रवारी रात्री नवी मार्गसूची जारी केली आहे. राज्यात प्रामुख्याने बेंगळूरमध्ये रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण अधिक आहे.
त्यामुळे बेंगळूरमध्ये मागील चार दिवसांपासून मास्क सक्तीचा आदेश देण्यात आला होता. आता राज्यभरात सार्वजनिक ठिकाणे, स्वतःच्या वाहनासह सर्व प्रकारची वाहने, रेल्वे तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, पब मॉल, शिक्षण संस्था, कार्यालये, कारखान्यांमध्ये मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. मास्क नसणाऱयांना आतमध्ये प्रवेश देऊ नये, अशी सक्त सूचनाही करण्यात आली आहे. मास्क परिधान केल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित संस्था अथवा कंपन्यांची असणार आहे.
आरोग्य खाते ‘अलर्ट’
संसर्ग वाढत असल्याने आरोग्य खाते ‘अलर्ट’ झाले आहे. नव्याने जारी करण्यात आलेल्या मार्गसूचीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही संबंधित अधिकाऱयांना देण्यात आली आहे. मास्कसक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आणि मार्शलांची मदत घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
आयएलआय आणि सारीची लक्षणे असणाऱयांनी, अती जोखमीच्या प्रदेशात राहणारे आणि इतर आरोग्यविषयक समस्यांनी ग्रस्त असणाऱयांची कोविड चाचणी करणे तसेच त्यांच्या चाचणीचा अहवाल येईपर्यंत होम आयसोलेशन करण्याची सूचना आरोग्य अधिकाऱयांना देण्यात आली आहे.
शुक्रवारी 525 कोरोनाबाधितांची भर
दोन आठवडय़ापूर्वी राज्यात दिवसाला 200 च्या आसपास नव्या बाधितांची नोंद होत होती. शुक्रवारी हा आकडा 525 वर पोहोचला. त्यापैकी 494 रुग्ण हे बेंगळूर शहर जिल्हय़ातील आहेत. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 3,177 पर्यंत पोहोचली आहे. राज्यात कोविड चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर 2.45 टक्के इतका आहे.