शहापूर विभागात उत्साहात : मार्गावर आकर्षक रांगोळ्या : दौडीत युवक-युवतींचा सहभाग
बेळगाव : भल्या पहाटे उठून हातात शस्त्र घेऊन धावणे हा दौडचा उद्देश नसून शिवभक्तांमध्ये प्रबोधन व्हावे, ऐतिहासिक घटना आजच्या पिढीला समजाव्यात हा आहे. त्यामुळे रविवारी शहापूर विभागात झालेल्या दौडमध्ये ऐतिहासिक, सामाजिक देखावे सादर करण्यात आले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे देखावे रविवारच्या दौडचे आकर्षण ठरले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने काढण्यात आलेल्या आठव्या दिवशीच्या दौडची सुरुवात अंबाबाई देवस्थान, नाथ पै चौक, शहापूर येथून झाली. शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई व धारकरी संजू चंदगडकर यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली. यावेळी अशोकराव माने, चंद्रशेखर चुडमुंगे, चिमासाहेब पाटील, गुरुदत्त देसाई उपस्थित होते. रविवारी झालेल्या या दौडमध्ये म्हैसूर येथून आलेले शिवभक्त रामचंद्र जगताप, रामचंद्र सावंत, महादेव गावडे, यशवंत पवार, देवराव सावंत, सुबराव सूर्यवंशी सहभागी झाले होते. शहापूर येथील गल्ल्यांमधून दुर्गामाता दौडचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या. शिवभक्तांनी सादर केलेले देखावे नेत्रदीपक ठरत होते. शहापूरमधील प्रमुख गल्ल्यांना आकर्षक सजावट करण्यात आली होती. गोवावेस येथील बसवेश्वर सर्कलमध्ये दुर्गामाता दौडची सांगता झाली. रावसाहेब देसाई व म्हैसूर येथील रामचंद्र जगताप यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. दहा दिवस होणाऱ्या या दौडमध्ये शहापूरची दौड सर्वाधिक लांबीची असते. धारकऱ्यांनी तब्बल 16 कि. मी. धावून दौडमध्ये सहभाग घेतला होता. बालचमूंचीही संख्या रविवारी अधिक होती.
मंगळवार दि. 24 रोजीचा दौडचा मार्ग
मारुती गल्ली येथील मारुती मंदिरपासून दौडला सुरुवात होणार आहे. नरगुंदकर भावे चौक, श्र्री महालक्ष्मी मंदिर बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, लोकमान्य रंगमंदिर रोड, कोनवाळ गल्ली, अनसूरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खुट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, कंग्राळ गल्ली मागील बाजू, सरदार्स ग्राऊंड रोड, कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, काळी आमराई, कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता होणार आहे.









