पुणे / प्रतिनिधी :
उद्योगपती गौतम अदानी यांना काँग्रेसने मोठे केले असेल, तर गेल्या 50 वर्षांत अदानी कुठे होते आणि मागच्या आठ-नऊ वर्षांतच ते कसे काय प्रकाशझोतात आले? मुख्य म्हणजे पंतप्रधान अदानींवर काही का बोलत नाहीत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी काँग्रेस भवन येथे नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या सर्व आघाडय़ांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदानींबाबत प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न अभ्यासपूर्वक होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी पानटपरीवर बोलत असल्यासारखे भाषण केले. अदानी एवढे सज्जन आहेत, तर पंतप्रधान काहीच बोलत का नाहीत, हाच मुळात प्रश्न आहे. काही जण काँग्रेसनेच अदानींना मोठे केले, असे म्हणतात. मग मागच्या 8 वर्षांतच ते प्रकाशात कसे आले, याचे उत्तरही संबंधितांनी द्यावे.
कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक आपण पक्ष म्हणून लढवत आहोत. उमेदवारांनी आपल्याला नमस्कार करावा, अशी अपेक्षा न ठेवता आपण स्वत: उमेदवार आहोत, असे समजून प्रत्येकाने काम करावे, असे आदेश देतानाच ही निवडणुक आपली ताकद दाखवण्याची आणि आपल्या राजकीय प्रवासाची चांगली सुरुवात करण्याची संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल