ऑनलाईन टीम / तरुण भारत :
2014 पासून साथ देणाऱ्या घटक पक्षांचा भाजपने सत्तास्थापनेत विचार केला नाही, तर आम्हाला आगामी एकला चलोची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. पंढरपूरमधील संत नामदेव पायरीपासून त्यांनी जनस्वराज्य यात्रेचा शुभारंभ केला. त्यावेळी ते म्हणाले, भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना सत्तास्थापनेत डावलल्यास रासप लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा लढवेल. भाजपच्या एककलमी कार्यक्रमामुळे आम्हाला एकला चलोची भूमिका घ्यावी लागेल. रासपने एकला चलोची भूमिका घेतल्यास धनगर समाजाची मतं भाजपच्या विरोधात जाऊ शकतात. याचा भाजपला मोठा फटका बसेल.
दरम्यान, महादेव जानकर हे बारामती अथवा परभणीमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढविल्यास भाजपसाठी ते अडचणीचे ठरु शकते.








