ईशान्य भारतातील नेत्यांचा युनुस यांना इशारा
वृत्तसंस्था / गुवाहाटी
चीनने भारतावर हल्ला करुन ईशान्य भारत भारतापासून तोडावा, अशी अप्रत्यक्ष सूचना करणारे बांगला देशचे नेते मोहम्मद युनुस यांना भारताने धारेवर धरले आहे. युनुस यांनी चीनला चिथावणी दिल्यास आम्हीही बांगला देशचे तुकडे करु शकतो, हे यांनी ध्यानात घ्यावे, असा इशारा ईशान्य भारतातील भारतीय नेत्यांनी त्यांना दिला आहे. युनुस यांनी दोन दिवसांपूर्वी हे वादग्रस्त व्यक्तव्य केले होते.
युनुस यांनी काही दिवसांपूर्वी चीनचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी भारताच्या संदर्भात काही आक्षेपार्ह आणि निषेधार्ह तसेच आगलावी वक्तव्ये केली होती. चीन आणि बांगला देश यांच्यात भारताची एक चिंचोळी पट्टी आहे. ती ‘चिकन नेक’ या नावाने परिचित आहे. ही पट्टी चीनने ताब्यात घेतल्यास तो देश बांगला देशच्या संपर्कात येऊ शकतो. तसेच भारताची ईशान्येकडील सात राज्ये भारतापासून तुटू शकतात, अशा अर्थाचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याची गंभीर नोंद भारताने घेतली असून त्यांना हा इशारा दिला आहे.
प्रक्षोभक आणि निंदनीय
मोहम्मद युनुस यांनी केलेली विधाने अत्यंत प्रक्षोभक, चिथावणीखोर आणि निंदनीय आहेत. भारताची शक्ती त्यांना माहीत नाही. ते स्वप्नांच्या दुनियेत वावरत आहेत. आम्ही मनात आणले तर बांगला देशचे तुकडे करु शकतो आणि समुद्रावर नियंत्रण मिळवू शकतो. 1947 मध्ये भारताने तत्कालीन सरकारच्या अत्यंत ढिसाळ धोरणामुळे महत्वाच्या चितगाव बंदरावरचा भारताचा ताबा गमावला. ती गंभीर चूक होती. म्हणून आज बांगला देशचे नेते मुजोरीची भाषा करीत आहेत, अशी अत्यंत कठोर टीका तिप्रामोथा पक्षाचे नेते प्रद्योत माणिक्य यांनी केली आहे. भारताने बांगला देशला आव्हान देण्यासाठी एक धोरणात्मक समुद्रीमार्ग विकसीत केला पाहिजे, अशी सूचनाही माणिक्य यांनी बोलताना केली.
खेडा यांचीही टीका
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीही युनुस यांच्यावर शरसंधान केले. भारताची कोंडी करण्यासाठी बांगला देश चीनला बोलावित आहे. चीनचा विस्तारवाद वाढत असून त्यामुळे ईशान्य भारताला धोका निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईशान्य भारताचे संरक्षण करण्यात अपयश आले आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार धोरण अत्यंत विस्कळीत असून त्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. केंद्र सरकार याला जबाबदार आहे, असे प्रतिपादनही खेडा यांनी केले.









