वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अयोध्येत एका दलित कुटुंबातील युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेस नेते उदित राज यांनी अयोध्येतील राममंदिरावर बुलडोझर चालविण्यासंबंधी केलेल्या विधानामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. ही युवती अयोध्येत निर्माण होत असलेल्या भव्य राममंदिरात स्वच्छता करण्याच्या कामावर होती. तथापि, तिच्यावर झालेल्या बलात्काराचा संबंध तिच्या कामाशी नाही, असे स्पष्टीकरण अयोध्या पोलिसांनी दिले असून यासंबंधीची वृत्ते खोडसाळ आणि दिशाभूल करणारी आहेत, असेही वक्तव्य पोलिसांनी केले आहे. उदित राज यांनी या प्रकरणाची पूर्ण माहिती न घेताच प्रक्षोभक विधान केल्याने त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.
ही दलित कुटुंबातील युवती राममंदिराच्या अनेक स्वच्छता कामगारांपैकी एक होती. तथापि, तिच्याशी घडलेल्या दुष्कर्माशी तिच्या कामाचा किंवा राममंदिराचा कोणताही संबंध नाही. तिने अयोध्या पोलिसांकडे सादर केलेल्या तक्रारीत तिने स्वत: हा गुन्हा कसा घडला, याची माहिती दिली आहे. ती काही दिवसांपूर्वी तिच्याशी परिचित असणाऱ्यांच्या घरी दोनवेळा गेली होती. तिथे तिचा मित्र आणि त्याचे काही अन्य मित्र यांनी दुष्कर्म केले. तिने त्यांच्या विरोधात तक्रार सादर केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सहा आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन युवकांचाही समावेश आहे. हे दुष्कर्म राममंदिर परिसरात झालेले नसून तिच्या परिचितांच्या घरी झालेले आहे. हा प्रसंग तिच्या राममंदिरातील कामाशी संबंधित नसूनही चुकीच्या पद्धतीने वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली आहेत. हा हेतुपुरस्सर दिशाभूल करुन राममंदिराच्या व्यवस्थापनाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरण प्रशासनाने त्वरित दिले आहे.
2 सप्टेंबरला तक्रार
या युवतीने तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगासंबंधी तक्रार 2 सप्टेंबरला सादर केली आहे. तिच्या तक्रारीतील माहितीनुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले आहे. तसेच विनय पासी, शिवा सोनकर, उदित सिंग आणि सत्यम या चार सज्ञान आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. पीडित युवतीने तिच्याशी झालेल्या दुष्कर्माचा संबंध तिच्या तक्रारीत कोणत्याही प्रकारे राममंदिराशी किंवा राममंदिरात ती करत असलेल्या कामाशी जोडलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही दिशाभूल करणारी वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली होती.
उदित राज यांचा निषेध
उदित राज यांनी या घटनेसंबंधी राम मंदिरावर बुलडोझरची भाषा केल्याने तीव्र संतापाच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत. सोशल मिडियावर उदित राज यांना ट्रोल करण्यात येत आहे. समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. तथापि, त्यातून तेच उघडे पडत आहेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









