गोवा एससी-एसटी आयोगाचा निवाडा
पणजी : भाटकाराच्या जमिनीत अनेक वर्षापासून शेती करीत किंवा कसत असलेल्या एससी -एसटी व्यक्तीला त्या संबंधित जागेवर शेती करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचा निवाडा एससी – एसटी आयोगाने दिला आहे. त्यांना कोणी अडथळा आणू शकत नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. चांदेल – पेडणे येथील साजगो जाधव हे काही जमिनीत अनेक वर्षापासून शेती करीत होते परंतु नंतर काहीजणांनी त्यांची अडवणूक सुरु केली आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. जाधव यांनी याप्रकरणी आयोगाकडे धाव घेतली आणि याचिका सादर केली. त्यावर अनेकवेळा सुनावणी घेण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर यांनी त्या याचिकेवर निवाडा दिला आहे. जाधव शेती करत असलेल्या सर्व्हे नंबरातील जमिनीत कोणालाही लुडबूड करता येणार नाही. एससी-एसटी वर्गातील लोक स्वत:च्या किंवा भाटकाराच्या जमिनीत गेल्या अनेक वर्षापासून शेती करीत असतील किंवा कसत असतील तर त्यांना रोखण्यात येऊ नये, असे निवाड्यातून स्पष्ट करण्यात आले आहे. या निवाड्यामुळे अनेक एससी – एसटीना मोठा दिलासा मिळाला आहे. गोव्यात अनेक गावांत भाटकार व एससी -एसटीमध्ये शेती करण्यावरुन वाद होतात. त्या वादाला आता निवाड्यातून पूर्ण विराम मिळणार आहे.








