आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीनुसार निर्णय : पेट्रोलियम मंत्र्यांचे दिलासादायी वक्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करू शकतील, असे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी सांगितले. कच्च्या तेलाच्या सतत कमी होत असलेल्या किमतींमुळे भारतीय तेल कंपन्यांवर इंधनाच्या किमती कमी करण्याचा दबाव वाढू लागला आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत. तेल विपणन कंपन्यांनी त्यांचे नुकसान भरून येईपर्यंत किमती कमी करण्यास नकार दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात सरकारकडून निवेदन देण्यात आले आहे.
इंधनाच्या किमतींवरील विविध प्रश्नांना उत्तर देताना पुरी यांनी सद्यस्थितीत सरकार या विषयावर कोणतीही घोषणा करण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगितले. तेल कंपन्यांचे आगामी तिमाही निकाल चांगले असतील, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी गेल्या तिमाहीत दर स्थिर ठेवत काही प्रमाणात नुकसान भरून काढले आहे. त्यामुळे आता नजिकच्या काळात दिलासा देण्याचा विचार होऊ शकतो, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले. रशिया-युव्रेन युद्धानंतर मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल 139 डॉलर्सवर पोहोचल्या. मात्र, आता या किमती 75-76 डॉलर्सपर्यंत खाली आल्या आहेत.
तेल कंपन्यांवर दबाव
तेल कंपन्या लवकरच किमतीत कपात करण्याची घोषणा करू शकतात, असे वृत्त होते. मात्र, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील मार्जिनमध्ये वाढ झाली असली तरी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी गेल्या वषी झालेल्या तोट्याची भरपाई केल्यानंतरच किमतीत किरकोळ बदल संभवू शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या वषीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज होणाऱ्या बदलांवर बंदी घातली आहे. तिन्ही कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीपासून पेट्रोलवर सकारात्मक मार्जिन कमावले आहे. परंतु डिझेल विक्रीत नुकसान होत असल्याचा दावा केला जात आहे.