जिल्हाधिकाऱ्यांकडून कन्नड संघटनांना खूश करण्याचा प्रयत्न : मराठी विरोधात कन्नड संघटनांचे तुणतुणे
बेळगाव : मराठी विरोधात नेहमीच गरळ ओकणाऱ्या कन्नड संघटनांनी गुरुवारी पुन्हा एक नोव्हेंबर रोजी काढल्या जाणाऱ्या काळ्यादिनाच्या फेरीला परवानगी देऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 69 वर्षांनीही मराठी भाषकांची काळ्dयादिनी होणारी एकी कन्नड संघटनांच्या डोळ्यात खुपत आहे. या संघटनांना खूश करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी फेरीला परवानगी दिली जाणार नाही, असे वक्तव्य केले.
गुरुवारी जिल्हा पंचायत सभागृहात 1 नोव्हेंबर साजरा करण्याबाबत कन्नड संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी यांसह इतर उपस्थित होते. बैठकीमध्ये राज्योत्सव साजरा करण्यापेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काढल्या जाणाऱ्या काळादिन फेरी विरोधातच अधिक चर्चा झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीची धास्ती घेतली असल्याने त्यांना रोखण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा केला.
मागील 69 वर्षांपासून मराठी भाषिकांचा आपल्या मायभूमीसाठीचा लढा सुरू आहे. राज्योत्सव साजरा करण्यापूर्वीपासून बेळगावसह सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी कडकडीत निषेध पाळून सायकल फेरी काढली जाते. ही निषेध फेरी कन्नड संघटनांच्या डोळ्dयात खूपत असल्याने मागील काही वर्षांपासून काळादिन फेरीला परवानगी देऊ नये, यासाठी कन्नड संघटनांचे तुणतुणे सुरू असते. असाच प्रकार गुरुवारीही बैठकीत घडला. महाराष्ट्र एकीकरण समितीला काळादिन फेरी
काढण्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. महाराष्ट्र एकीकरण समिती लोकशाहीमार्गाने सीमाप्रश्नाची लढाई लढत आहे. शांततेच्या मार्गाने 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळून फेरी काढली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या फेरीला परवानगी नाकारल्याचे सांगितल्याने महाराष्ट्र एकीकरण समिती यापुढे काय भूमिका घेणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.









