वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
टेस्ला प्रमुख एलन मस्क यांना सल्लागार नियुक्त करण्यास मी तयार असल्याचे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आहेत. निवडणुकीत विजयी झाल्यावर मस्क यांना सल्लागार किंवा कॅबिनेटमध्ये पद देण्याची माझी तयारी आहे. मस्क हे अत्यंत हुशार असून त्यांची इच्छा असल्यास त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात येईल असे ट्रम्प यांनी नमूद केले आहे.
ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर मस्क यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मस्क यांनी सेवा करण्यासाठी तयार असल्याचे म्हणत मस्क यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये एक एआय छायाचित्रही जोडले आहे. यात ते डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसी (डीओजीई) असा उल्लेख असलेल्या पोडियमसमोर उभे दिसून येतात. यात डीओजीईला शॉर्टफॉर्ममध्ये लिहिले गेले आहे.
डीओजीई एक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइनचा शॉटफॉर्म देखील आहे. मस्क दीर्घकाळापासून या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करत आहेत. डॉजकॉइनला 2013 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी सुरु केले होते.
धोरण सल्लागार
ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तर मस्क यांना प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. ट्रम्प हे मस्क यांना स्वत:चे धोरण सल्लागार म्हणून नियुक्त करू शकतात. मस्क हे आर्थिक आणि सीमासुरक्षेशी निगडित धोरणांवर अधिक प्रभाव पाडू शकतात. मस्क यांनी 12 ऑगस्ट रोजी एक्स स्पेसवर ट्रम्प यांची मुलाखत घेतली होती. यादरम्यान ट्रम्प यांनी मस्क यांचे कौतुक केले होते.









