विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा यांचा इशारा : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत धूळ, धूर, जलप्रदूषणाची परिसीमाj,काही उद्योजकांनी बळकावली तब्बल 40 हजार चौ. मी. जमीन
पणजी : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत धूळ, धूर, जलप्रदूषणाने परिसीमा गाठली असून हे सर्व असह्य होऊन लोक अक्षरश: हैराण झाले आहेत. यासंबंधी वारंवार तक्रारी कऊनही सरकार काहीच करत नसल्याने आता कुंकळ्ळीच्या ऐतिहासिक लढ्याच्या धर्तीवर पुन्हा एकदा लढा उभारावा लागेल, असा गंभीर इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला. याप्रकरणी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असेही ते म्हणाले. विधानसभा अधिवेशनात काल शुक्रवारी प्रश्नोत्तर तासात वरील औद्योगिक वसाहतीसंबंधी प्रश्न उपस्थित करून तेथील गैरकारभार सभागृहाच्या नजरेस आणून देताना ते बोलत होते. आमदार एल्टन डिकॉस्टा यांनीही याप्रश्नी त्यांना साथ दिली.
चाळीस हजार चौ.मी. जमीन बळकावली
राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक प्रकल्पांकडून हवा आणि आवाजाचे प्रदूषण होत असतानाच याच प्रकल्पांकडून परिसरातील जमिनी बळकावण्याचे प्रकारही होत आहे. एका कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतच तब्बल 40 हजार चौ. मी. जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यात काही खाजगी जमिनींचाही समावेश आहे.
कचऱ्यामुळे होतेय भूजलाचेही प्रदूषण
बळकावलेल्या या जमिनींमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे भूजलाचेही प्रदूषण होऊ लागले आहे, असे डिकॉस्टा यांनी निदर्शनास आणून दिले. अशा प्रकारचे प्रदूषणकारी प्रकल्प स्थापन करणारे बहुतेक उद्योजक हे बिगर गोमंतकीय असून येथील मातीशी जराही इमान नसलेल्या या लोकांनी गोमंतकीयांना थेट गृहितच धरून मनमानी चालविली आहे.
बिगरगोमंतकीय कामगारांचे बेकायदा वास्तव्य
या बिगर गोमंतकीय उद्योजकांनी आणलेले सुमारे 300 बिगरगोमंतकीय कामगार या सभोवतालच्या भागात बेकायदेशीरपणे वास्तव्य करून आहेत, त्यांच्यामुळे सर्वत्र असह्य गलिच्छता पसरली आहे, असे आलेमाव यांनी निदर्शनास आणून दिले. तरीही सरकारला काहीच पडलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.
सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : डिकॉस्टा
आमदार डिकॉस्टा यांनीही त्यावेळी बोलताना कुंकळ्ळी वसाहतीत जमिनी बेकायदेशिररित्या बळकावण्याचे प्रकार घडत असतानाही सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. या गोष्टींचा आता अतिरेक होऊ लागला असून स्थानिक लोक प्रचंड भडकले आहेत. त्याचा कधीही विस्फोट होऊ शकतो. कुंकळ्ळीला लढ्याचा इतिहास संपूर्ण गोव्याला माहीत आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, असे सरकारला वाटत असेल तर वेळीच कारवाई करावी, असा इशारा आलेमाव व डिकॉस्टा यांनी दिला.
औद्योगिक वसाहतींचे सर्वेक्षण सुरु : गुदिन्हो
यावेळी बोलताना मंत्री गुदिन्हो यांनी, केवळ एकाच नव्हे तर राज्यातील प्रत्येक औद्योगिक वसाहतीत अतिक्रमणे झाली असल्याचे सांगितले. या सर्व वसाहतींचे ग्लोबल पोझिशनिंगद्वारे डिजिटल सर्वेक्षण हाती घेतले आहे. 23 पैकी 18 वसाहतींचे सर्व्हेक्षण (80 टक्के) पूर्ण झाले असून त्यानंतर धोरण निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या सर्वेक्षणामुळे नक्की किती जमिनींवर अतिक्रमण झाले आहे ते स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. या औद्योगिक वसाहती या काही काल परवा स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. तरीही एवढ्या वर्षात त्यांचे सर्वेक्षण कधीच झाले नव्हते, ते काम आम्ही हाती घेतले आहे, असे सांगण्यास गुदिन्हो विसरले नाहीत.









