उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची प्रतिक्रिया : मुख्यमंत्रिपदाचे प्रयत्न सोडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
बेंगळूर : बिहारमध्ये इंडिया आघाडीला सत्तेवर आणले तर मला सर्व पदे मिळाल्यासारखे होईल, असे सांगून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदासाठीचे प्रयत्न सोडून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शिवकुमार यांची पुढील भूमिका काय असेल, याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. बेंगळूरमध्ये रविवारी बिहारी समुदायाशी डी. के. शिवकुमार यांनी संवाद साधला. याप्रसंगी बिहारमधील एका नेत्याने शिवकुमार यांनी मुख्यमंत्री बनावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर नम्रपणे उत्तर देताना शिवकुमार यांनी, बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील इंडिया आघाडीचा विजय झाला, तर मला सर्व प्रकारची पदे मिळाल्यासारखे होईल, असे सांगितले.
राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला मुख्यमंत्रिपद देण्यासाठी शिवकुमार यांनी हायकमांडवर दबाव आणल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य काँग्रेसमध्ये ‘नोव्हेंबर क्रांती’विषयी व्यापक चर्चा सुरू आहे. डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री बनतील अशी अफवा पसरली आहे. त्याच वेळी शिवकुमार यांच्या समर्थकांकडून सातत्याने उघडपणे वक्तव्ये होत असल्याने गोंधळात भर पडली आहे. अलीकडेच बेंगळूरच्या लालबाग येथे जनस्पंदन कार्यक्रमावेळी अनेक जणांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवावे, अशी मागणी केली होती.
तेव्हा शिवकुमार यांनी तेथील उपस्थितांना फक्त जनतेच्या समस्यांवर बोला असे सांगून मुख्यमंत्री बदलाबाबत वाच्यता करणाऱ्यांना गप्प केले होते. सत्ताधारी काँग्रेसमधील आमदारांनाही अधिकार वाटपाच्या मुद्द्यावर कोणीही उघपणे वक्तव्ये करू नयेत, अशी ताकीद शिवकुमार यांनी दिली होती. कोणतीही संधी हवी असेल तरी हायकमांडकडून मिळणे आवश्यक आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. त्यामुळे ते उघडपणे व्यक्त होणाऱ्या राजकीय चर्चांना प्राधान्य देत नाहीत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेंगळूरमध्ये रोजंदारीसाठी वास्तव्यास असलेल्या बिहारी समुदायाच्या सभेतही शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचे प्रयत्न सोडून दिल्याप्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, यातून ते हायकमांडला कोणता संदेश देत आहेत, याबाबत उत्सुकता वाढली आहे.









