शशी थरूर यांचा काँग्रेस नेतृत्वाला संदेश
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
काँग्रेस खासदार शशी थरूर आणि काँग्रेस नेतृत्वादरम्यान सर्वकाही आलबेल नाही. राहुल गांधी यांची भेट घेतल्यापासून थरूर हे नाराज आहेत. थरूर यांनी राहुल गांधी यांना पक्षातील स्वत:च्या भूमिकेविषयी विचारले होते, परंतु राहुल गांधी यांनी कुठलेही स्पष्ट उत्तर दिले नसल्याचे समजते. तर दुसरीकडे केरळ काँग्रेस देखील थरूर यांच्यावर टीका करत आहे. परंतु आता थरूर यांनी स्वत:चे म्हणणे उघडपणे मांडण्यास सुरुवात केली आहे पक्षाला माझी गरज नसल्यास माझ्याकडे अनेक पर्याय आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
थरूर यांनी अलिकडेच एका लेखाद्वारे केरळमधील पिनाराई विजयन सरकारचे कौतुक केले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स अन् अमेरिका दौऱ्याचे देखील त्यांनी कौतुक केले होते. थरूर यांच्या याच कृतीमुळे काँग्रेस नेतृत्व त्यांच्यावर नाराज आहे. मी पक्षासाठी उपलब्ध आहे, परंतु पक्षाला माझी आवश्यकता नसेल तर माझ्याकडे पर्याय उपलब्ध आहेत असे थरूर यांनी म्हटले आहे.
थरूर हे केरळच्या तिरुअनंतपुरम मतदारसंघाचे खासदार आहेत. तिरुअनंतपुरममध्ये पक्षापेक्षा अधिक माझा प्रभाव लोकांवर अधिक आहे. काँग्रेसचे विरोधक मानले जाणाऱ्या लोकांनीही मला मतदान केले आहे. यातून लोकांना माझी बोलण्याची अन् वर्तनाची पद्धत पसंत असल्याचे स्पष्ट होते असा दावा थरूर यांनी केला आहे.
काँग्रेसला व्याप्ती वाढवावी लागणार
केरळमध्ये काँग्रेसला स्वत:च्या मतदारांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांनाही स्वत:कडे आकर्षित करण्याची गरज आहे. मला वैयक्तिक स्वरुपात मिळालेले समर्थन याचे उदाहरण आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडी मिळूनही काँग्रेस सातत्याने विधानसभा निवडणुकीत पराभूत होत आहे. जर काँग्रेसने अन्य लोकांपर्यंत पोहोचण्यास यश मिळविले नाही तर केरळमध्ये सलग तिसऱ्यांदा विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागणार असल्याचे थरूर म्हणाले. केरळमध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.
मोदी, केरळ सरकारचे कौतुक
पंतप्रधान मोदी आणि केरळ सरकारच्या कौतुकातून निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी मतप्रदर्शन केले आहे. जेव्हा केरळ अन् देशाचा मुद्दा असतो, तेव्हा मी नेहमीच निडरपणे स्वत:चे विचार मांडत असतो. मी कधीच संकुचित राजकारण केलेले नाही. मी एका नेत्याप्रमाणे विचार करत नाही. याचमुळे मी कधीकधी विरोधी पक्ष आणि सरकारच्या चांगल्या पुढाकाराचे कौतुक देखील करतो असे थरूर म्हणाले.









