मल्लिकार्जुन खर्गे यांची खासगी मुलाखातील भूमिका स्पष्ट
प्रतिनिधी/ बेंगळूर
येत्या 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पराभूत झाल्यास जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी तयार आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी पक्ष पराभूत झाल्यास कोणत्याही आरोपाचा सामना करण्याची माझी तयारी आहे. राज्यात पक्ष बहुमतासह सत्तेवर येणार आहे. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. आपल्या पक्षाला स्थिर सरकार रचनेची संधी मतदारांकडून मिळणार आहे, असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.
प्रबळ इच्छाशक्ती आणि कटिबद्धता असणे गरजेचे आहे. मी दररोज चार प्रचारसभा घेत आहे. काही प्रसंगी सायंकाळच्या सभांना हजर होण्यासाठी शंभर किलोमीटरपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. भाजपला पराभूत करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सर्वकाही सहन करण्याची तयारी पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
तुमच्या आशीर्वादाने काँग्रेसचा पक्षाध्यक्ष
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर येथे प्रचार केला. त्यांनी येथील काँग्रेसचे उमेदवार एम. वाय. पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन जनतेला केले. कलबुर्गीतील जनतेने मागील लोकसभा निवडणुकीत आपल्याला साथ दिली नाही. मात्र, वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी साथ सोडली नाही. केंद्रात आपल्याला संपुआ सरकारमध्ये कामगार, रेल्वे खात्यासह इतर खात्यांची जबाबदारी मिळाली होती. लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते पदही मिळाले. आता तुमच्या आशीर्वादाने पक्षाध्यक्षपद सांभाळत आहे. आता पक्षाचे उमेदवार एम. वाय. पाटील यांना निवडून आणा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.









