अधीर रंजन चौधरींचे भाजप सरकारला आव्हान
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पाकव्याप्त काश्मीरसंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना ‘हिंदुस्थानचे बहादुर’ अशी उपरोधिक उपमा देत त्यांना आव्हानही दिले आहे. या दोघांनी पाकव्याप्त काश्मीरमधून एक सफरचंद तरी आणून दाखवावे. तसेच हिंमत असेल तर 2024 च्या निवडणुकीपूर्वी पीओके भारतात सामील करवून दाखवा, पूर्ण देश भाजपला मतदान करेल असे चौधरी यांनी म्हटले आहे. 2019 मध्ये कलम 370 हटविण्यात आल्यावर शाह हे पीओके परत मिळविण्याचे वचन देत होते. मोदी सरकारला 10 वर्षे झाली आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार 6 वर्षे राहिले होते. पीओके परत मिळविण्यापासून भाजपला कुणी रोखले? हिंदुस्थानात दोन बहादुर असून त्यांनी पीओकेवर ताबा मिळवावा असे चौधरी म्हणाले. चीन आणि पाकिस्तान पीओकेत इकोनॉमिक कॉरिडॉर निर्माण करत आहेत. याप्रकरणी मोदी आणि अमित शाह मौन बाळगून आहेत. जी-7, एससीओमध्ये सामील होतात, मग तेथे का प्रयत्न केले नाहीत? काँग्रेस जे करू शकला नाही ते भाजपने करून दाखवावे. किमान पीओकेतून सफरचंद तरी आणून दाखवा असे उपरोधिक आव्हान चौधरी यांनी दिले आहे.









