पुणे / प्रतिनिधी :
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मांडलेल्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझी प्रत्येक भूमिका सगळय़ांना पटेलच असे नाही. माझी भूमिका चुकीची ठरवणारे हे कोण? माझे विधान तुम्हाला द्रोह वाटत असेल, तर माझ्यावर खुशाल केसेस दाखल करा, असे खुले आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले.
पुण्यामध्ये ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरऐवजी स्वराज्यरक्षकच म्हटले पाहिजे, असे विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. पवार यांचे हे विधान म्हणजे द्रोहच असल्याचा निशाणा उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला आहे. त्यावर अजित पवार यांनी थेट फडणवीस यांनाच आव्हान दिले. मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो. तुम्ही भारतीय नागरिक म्हणून कायद्याचे पालन केले पाहिजे. हे करताना प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. विचारस्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी जी काही भूमिका मांडली पाहिजे, ती सर्वांना पटावी, असे माझे म्हणणे नाही. तसेच माझी भूमिका चुकीची आहे, हे तुम्ही ठरवणारे कोण, असा सवालही त्यांनी केला.
अधिक वाचा : ‘महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे पुण्यात अनावरण
मी माफी मागावी, असे काही जण म्हणतात. मी असा काय गुन्हा केला? अपशब्दही वापरले नाहीत. राज्यपाल, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी बेताल वक्तव्य केले. अपशब्द वापरले. जे शब्द वापरायला नको होते, ते शब्द सत्ताधाऱ्यांनी वापरले. जीवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आम्ही द्रोह करणार नाही. आमच्याकडून तसे घडणार नाही. आमच्या दहा पिढय़ाही तसे करणार नाही, असेही पवार यांनी सुनावले.
भाजप हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही आक्रमक होण्याचा निर्णय घेतला का? असा सवाल केला असता अजितदादांनी थेट पक्षाचीच भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीची स्थापनाच मुळी स्वाभिमानातून झाली आहे. पहिल्यापासून आम्ही पुरोगामी विचार मानणारे आहोत. आम्ही काँग्रेसमध्ये होतो, तेव्हा काँग्रेसचा विचारही सर्वधर्मसमभावाचा होता. दोन्ही पक्ष वेगळे झाले, तरी पुरोगामीत्वाची कास घेऊन त्याच दिशेने आम्ही काम करत आहोत. महापुरुष आणि वडीलधाऱ्यांनी जी शिस्त घालून दिली, विचार दिला, त्याला धक्का न लावता पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.








