वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
कॅनडाच्या अमेरिकेत खपणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के अतिरिक्त कर लावला जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केल्याने कॅनडाची अर्थव्यवस्था धोक्यात येणार आहे. हा निर्णय 20 जानेवारीला ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर लागू होणार आहे. यामुळे चिंतीत झालेल्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी ट्रंप यांची काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जाऊन भेट घेतली होती. हा निर्णय घेऊ नये, अशी विनंती त्यांनी ट्रंपना केली होती. तथापि ट्रंप यांनी ही विनंती मान्य करण्यास नकार दिल्याचे दिसून येत आहे.
अमेरिकेने करात वाढ केल्यास कॅनडाची अर्थव्यवस्था मारली जाणार असेल, तर कॅनडाने सरळ अमेरिकेचा 51 वा प्रांत बनावे. तसे केल्यास कर वाढविण्याचा प्रश्नच येणार नाही, अशी प्रतिक्रिया ट्रंप यांनी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. ट्रंप यांची भेट घेण्यासाठी ट्रूडो यांनी अचानकपणे मागच्या आठवड्यात अमेरिकेचा अनधिकृत दौरा केला होता. कॅनडाला अनेक वस्तूंसाठी अमेरिकेवर अवलंबून रहावे लागते. तसेच कॅनडात उत्पादित झालेल्या अनेक वस्तूही अमेरिकेच्या बाजारपेठेत खपत असतात. या वस्तूंवर अमेरिकेने कर वाढविल्यास कॅनडाची त्या देशाला होणारी निर्यात प्रभावित होणार आहे. त्यामुळे ट्रूडो यांची ही धडपड सुरु आहे.
करवाढीच्या योजनेचे कारण काय…
अमेरिका आणि कॅनडा यांच्यात हजारो किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. ही सीमारेषा बहुतेक स्थानी खुली असल्याने कॅनडातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर स्थलांतर होत असते. हे स्थलांतर कॅनडाने रोखावे, अशी ट्रंप यांची मागणी आहे. हे स्थलांतर जोपर्यंत रोखले जात नाही, तोपर्यंत कॅनडाच्या वस्तूंवर वाढीव करआकारणी केली जाईल, अशी भूमिका डोनाल्ड ट्रंप यांनी घेतली आहे.









