राहुल गांधी यांची घोषणा : काँग्रेसला सत्तेवर आणण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास प्रत्येक ग्राम पंचायतीला 1 कोटी रुपये अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राज्याच्या विकासासाठी काँग्रेसला सत्तेवर आणा, असे आवाहनही त्यांनी केले.
कलबुर्गी जिल्ह्यातील जेवर्गी येथे काँग्रेस उमेदवार डॉ. अजय सिंग यांच्या प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले, राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास प्रत्येक ग्राम पंचायतीला 1 कोटी रुपये देण्यात येतील. राज्यात काँग्रेस पक्षच सरकार स्थापन करेल. काँग्रेसला सत्तेपासून रोखणे कोणालाही शक्य नाही. गरीब कुटुंबातील महिलेला दरमहा 2 हजार रुपये, प्रत्येक घराला 200 युनिट मोफत वीज, बेरोजगार पदवीधरांना 3 हजार रुपये बेरोजगार भत्ता, बेरोजगार डिप्लोमाधारकांना 1500 रुपये भत्ता दिला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला 150 जागांवर विजय मिळेल. भाजपच्या हाती सत्ता दिली तर 40 टक्के कमिशनला पुन्हा संधी दिल्यासारखे होईल. भाजप मतदारांना पैशांचे आमिष दाखवत आहेत. मात्र, या आमिषाला बळी पडू नका. भाजपमध्ये मुख्यमंत्रिपद 2,500 कोटी रुपयांना विक्रीसाठी असल्याचे यापूर्वी त्याच पक्षातील एका आमदाराने म्हटले होते. हे भ्रष्टाचाराचे स्पष्ट उदाहरण आहे. त्यामुळे तुम्ही भाजपला केवळ 40 जागा द्या, मात्र काँग्रेसला 150 जागा जिंकून सत्तेसाठी आशीर्वाद द्या, असे आवाहन राहुल गांधी यांनी मतदारांकडे केले.
कल्याण कर्नाटकासाठी आयआयटी
कल्याण कर्नाटक भागात भरती होणे गरजेच्या असलेल्या 50 हजार पदांची अद्याप भरती झालेली नाही. या भागात विशेषत: शैक्षणिक क्षेत्राचा विस्तार करण्यात येईल. आयआयटी आणि आयआयएम या प्रतिष्ठीत शिक्षण विभाग या भागात स्थापन केल्या जातील. तसेच 5 हजार कोटी रुपये विशेष अनुदान देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
पावसामुळे कार्यकर्त्यांची तारांबळ
प्रचारसभेत सहभागी होण्याआधी राहुल गांधी रोड शोमध्ये सहभागी झाले. प्रचारसभेतवेळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. भर पावसान मंडपातून पाणी गळत असतानाच त्यांनी भाषण सुरुच ठेवले. पावसाची पर्वा न करता सर्वजण हजर आहात. मात्र त्रास होत असल्याबद्दल माफी मागतो, असे राहुल गांधी म्हणाले.









