धुक्यामुळे हरियाणामध्ये दृश्यमानता 10 मीटर, राजस्थानमध्ये पावसाची शक्यता
वृत्तसंस्था/ शिमला
जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. हिमवृष्टीमुळे सध्या लाहौल आणि स्पिती येथील कुकुमसेरी येथील न्यूनतम तापमानात बरीच घट झाली आहे. येथील रात्रीचे तापमान उणे 6.9 अंशाच्या खाली गेले आहे. हिमाचलमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर तीन राष्ट्रीय महामार्गांसह 223 रस्ते बंद करण्यात आले आहेत. शिमल्यात सर्वाधिक 145 रस्ते बंद करण्यात आले, तर कुल्लूमध्ये 25 आणि मंडी जिल्ह्यात 20 रस्ते बंद करण्यात आले. हिमवर्षावामुळे येथे पोहोचलेले अनेक पर्यटक अडकले आहेत. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि जोरदार हिमवर्षावाचे सत्र पुढील काही दिवस राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले. दिल्ली एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पुढील दोन दिवसात तापमान आणखी खाली येऊ शकते. तसेच 9 राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये दृश्यमानता 10 मीटरपेक्षा कमी होती. त्याचवेळी, दिल्लीतील दृश्यमानता 100 मीटरपेक्षा कमी झाली. दिल्ली विमानतळाने काही उ•ाणे प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली आहे.
काश्मीर, उत्तराखंडमध्येही बर्फवृष्टी
काश्मीरमधील स्नोबेल्ट भागात बर्फवृष्टी झाली. अनेक ठिकाणी पारा उणेपर्यंत पोहोचल्यामुळे पाइपलाईनमध्ये पाणी साचले आहे. गुलमर्गमध्ये तापमान उणे 7.4 अंश सेल्सिअस, काझीगुंडमध्ये उणे 6.2 अंश सेल्सिअस नोंद झाले आहे. पंपोरमधील कोनिबल गावात उणे 8.5 अंश सेल्सिअस इतक्या न्यूनतम तापमानाची नोंद झाले आहे. उत्तराखंडमधील चमोली आणि उत्तरकाशीसारख्या उंच भागात बर्फवृष्टी झाली आणि सखल भागात हलका पाऊस झाला.









