हिमाचलमध्ये राष्ट्रीय महामार्गावर 1 फूट बर्फ : उत्तराखंडमध्ये हिमवर्षाव, जम्मू-काश्मीरमध्ये तळे गोठले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद आहेत. उत्तराखंडमधील बद्रीनाथ धाम परिसरात दिवसाचे तापमान उणे 4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून पुढील 3 दिवस बर्फवृष्टी सुरू राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हिमाचलमध्ये 2 महामार्गांसह 24 रस्त्यांवर सलग तिसऱ्या दिवशी बस वाहतूक बंद आहे. राष्ट्रीय महामार्ग 305 वर देखील सुमारे 1 फूट बर्फ आहे. प्रशासन बर्फ हटवण्याच्या प्रयत्नात व्यग्र आहे.
उत्तराखंडमध्ये जोशीमठ आणि पिथौरागढमध्येही बर्फवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग बंद आहेत. देहराडूनमध्येही तुनी-चक्रता-मसूरी राष्ट्रीय महामार्गाचा 30 किलोमीटरचा भाग बर्फवृष्टीमुळे बंद आहे. पुढील दोन ते तीन दिवस येथे बर्फवृष्टी सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीत जोरदार पाऊस झाला. याशिवाय मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशसह 8 राज्यांमध्ये वादळ, पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. येथे ताशी 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे या राज्यांचे तापमानही घसरणार आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी असून बर्फवृष्टीमुळे तापमान शून्याच्या खाली आहे. जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये हरितारा भागातील एक तलाव पूर्णपणे गोठल्याचे दृश्य शुक्रवारी निदर्शनास आले. या गोठलेल्या तलावावरच पर्यटक क्रिकेट खेळताना निदर्शनास येत होते.
आठ राज्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामान खात्याने राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवस ही स्थिती येथे कायम राहणार आहे. सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव कमी आहे.









