श्रीनगरमधील दल सरोवरावर अर्धा इंच बर्फाचा थर : बद्रीनाथमध्ये धबधबाही गोठला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, श्रीनगर
उत्तरेकडील राज्यांमध्ये पर्वतीय भागात तापमान ‘मायनस’मध्ये गेल्यामुळे कडाक्याची थंडी जाणवत आहे. तसेच हिमवर्षावही सुरू आहे. उत्तराखंडच्या उंच हिमालयीन भागातही अशीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी तापमान उणे 10 अंशांच्या खाली पोहोचले आहे. 21 डिसेंबरची रात्र ही श्रीनगरमधील 50 वर्षांतील सर्वात थंड रात्र होती. येथील तापमान उणे 8 अंश होते. येथील दल सरोवरही गोठले असून तलावाच्या पृष्ठभागावर बर्फाचा अर्धा इंच जाडीचा थर दिसून येत आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धामजवळील उर्वशी धाराचा धबधबा पूर्णपणे गोठला आहे. हवामान खात्याने मध्यप्रदेशात 23 ते 28 डिसेंबर दरम्यान पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. तसेच राजस्थानमध्येही पावसाची शक्यता आहे.
जम्मू काश्मीरमधील अनेक जिह्यांमध्ये तापमान उणे आहे. सोमवारी सकाळी श्रीनगरमध्ये पारा -3.6 अंश सेल्सिअस , पहलगाममध्ये -5.0 अंश सेल्सिअस, गुलमर्गमध्ये -4.8 अंश सेल्सिअस, सोनमर्गमध्ये -5.1 अंश सेल्सिअस, झोजिलामध्ये -25.0 अंश सेल्सिअस, अनंतनागमध्ये -6.1 अंश सेल्सिअस, शोपियांमध्ये -7.3 अंश सेल्सिअस, लेह -9.2 अंश सेल्सिअस, कारगिल -9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. घटलेल्या तापमानामुळे जम्मू-काश्मीर सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयांना हिवाळी सुटी जाहीर केली आहे.









