घरे, रस्ते, वाहनांवर बर्फाची चादर ः तापमान उणे 45 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेत कोरोना विषाणूसोबतच थंडीनेही कहर करायला सुरुवात केली आहे. देशातील जनता कडाक्याच्या थंडीशी झुंज देत आहे. प्रचंड बर्फवृष्टी आणि गोठवणाऱया तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अमेरिकेतील अनेक विमानोड्डाणे रद्द केल्याने ख्रिसमसचा आनंदोत्सवही हिरावला गेला आहे. हिमवादळामुळे अमेरिकेत 34 आणि कॅनडात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतील अनेक भागात पारा उणे 45 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. बर्फाच्या वादळामुळे रविवारी अमेरिकेत 1,707 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली. या भयंकर थंडीमुळे बफैलो आणि न्यूयॉर्क शहर सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. याशिवाय, वर्मोंट, ओहायो, मिसूरी, विस्कॉन्सिन, कॅन्सस आणि कोलोरॅडो येथेही वादळामुळे मृत्यूची नोंद झाली आहे. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात असलेल्या मेरिट शहरात बर्फाच्छादित रस्त्यावर बस घसरल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला. हिमवादळामुळे अमेरिका आणि कॅनडातील अनेक लोकांचा ख्रिसमसचा आनंद हिरावला आहे. लोकांनी ख्रिसमसच्या सुट्टीत नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास योजना रद्द केल्या आहेत. अमेरिकेतील 60 टक्के लोकसंख्या या हिमवादळाच्या तडाख्यात सापडली आहे. बरीच विमानोड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो लोक विमानतळांवर अडकून पडले आहेत. या वादळामुळे 15 लाख लोकांच्या घरांची वीज गेली असून घरे, वाहने आणि रस्त्यांवर बर्फाची ‘पांढरीशुभ्र’ चादर दिसून येत आहे. या वादळाची तीव्रता आणखी काही दिवस राहण्याची शक्यता असून दोन ते चार फूट बर्फ पडू शकतो, असा इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पोर्टलँड, ओरेगॉनमध्ये आपत्कालीन निवारे उघडण्यात आले आहेत









