वृत्तसंस्था/ श्रीनगर
उत्तर भारतातील तापमानात गेल्या चार दिवसांपासून तापमानात घट होत असून हिमवर्षावही सुरू आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बऱ्याच भागात झालेल्या हिमवृष्टीमुळे सर्वत्र ‘पांढरी चादर’ अंथरलेली दिसत आहे. हिमवर्षावामुळे आतापर्यंत 518 रस्ते बंद झाले असून येथे वाहनांची रहदारी थांबली आहे. याचदरम्यान श्रीनगर विमानतळावरील सर्व उ•ाणे रद्द करण्यात आली आहेत. काश्मीरच्या मैदानी भागात मध्यम हिमवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर दिसून आला. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात प्रचंड थंडी आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरूच आहे. विशेषत: हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये अधिक गंभीर परिस्थिती आहे. येथील बर्फवृष्टीचा आनंद पर्यटक घेत आहेत. दुसरीकडे रस्ते, हवाई वाहतूक आणि सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासोबतच प्रशासनाने हिमस्खलनाचा इशाराही दिला आहे. हिमाचलमध्ये परिस्थिती गंभीर होत आहे. राज्यातील ताज्या हिमवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीबाबत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली. शिमल्यात 161 रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच लाहौल आणि स्पितीमधील 157, कुल्लूमधील 71, चंबामधील 69 आणि मंडी जिह्यातील 46 रस्त्यांवर निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. लाहौल आणि स्पितीमध्ये रात्र सर्वात थंड राहिली आहे. येथील किमान तापमान उणे 4.9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.









