चीनमध्ये प्रत्येक वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये ‘हिममहोत्सव’ किंवा बर्फाचा महोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. ही प्रथा तशी फार पुरातन नसून अगदीच अलिकडच्या काळातील आहे. 1963 मध्ये या हिमउत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. चीनच्या उत्तरेला असणारे हार्बिन शहर या महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. या शहरात हिंवाळ्यात हिमाच्या म्हणजेच बर्फाच्या विविध कलाकृती आणि वस्तू बनविल्या जातात. या भागात तापमान अतिथंड असल्याने या वस्तू हिंवाळा संपून ताममान वाढीला लागेपर्यंत वितळत नाहीत. या शहरात जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये अशा हिमाच्या वस्तू निर्माण करण्याची स्पर्धाच भरते.
हे शहर हिमाच्या विविध कलाकृती आणि रचना यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. हा महोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी चीनचे प्रशासन तब्बल 41 कोटी डॉलर्स किंवा जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च करीत असते. या उत्सव काळात येथे अनेक लोक येतात आणि हिमापासून अनेक वस्तू निर्माण करतात. या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले जाते. ते पाहण्यासाठी सहस्रावधी लोक येतात. पांढऱ्या शुभ्र हिमाच्या या वस्तूंची शोभा एलईडी लाईटस्च्या साहाय्याने प्रकाशमान करुन अधिक वाढविली जाते. या काळात येथील तापमान उणे 30 ते 40 इतके असते. त्यामुळे, हिम वितळत नाही. परिणामी त्याच्यापासून वस्तू बनविणे शक्य होते. लाकडाप्रमाणे हिमाचे खंड कापून या वस्तू निर्माण करण्यात येतात.
जगात अनेक स्थानी हिममहोत्सव साजरे करण्यात येत असतात. तथापि, चीनमधील हा हिममहोत्सव सर्वात खर्चिक मानला जातो. चीनमध्ये या महोत्सवामुळे गेल्या काही दशकांमध्ये हिमशिल्पकला चांगलीच विकसीत झाली आहे. या महोत्सवात हिमापासून जगातील अनेक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृतीही निर्माण केल्या जातात. मात्र, त्या अल्पायुषी असतात. एकदा का हिंवाळा संपून उष्णता वाढली, या सर्व हिमवस्तू अपोआप साध्या पाण्यामध्ये रुपांतरीत होतात. त्यामुळे त्यांची निर्मिती प्रत्येक वर्षी नव्याने करावी लागते. हिमापासून वस्तू निर्माण करण्यासाठी कौशल्याची आवश्यकता असते. हा आंतरराष्ट्रीय महोत्सव असल्याने त्याची ख्याती साऱ्या जगात पसरली आहे.









