प्रतिनिधी / बेळगाव

ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएसई शाळेमध्ये आजी-आजोबा दिन, प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन व दहावीच्या विद्यार्थ्यांचा पासिंग आऊट परेड असा कार्यक्रम झाला. पहिल्या दिवशी बेळगावच्या समुपदेशक डॉ. राधिका कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या, मुलांच्या वर्तनाकडे नेहमी लक्ष द्या. आपल्या वर्तनातून मुले शिकत असतात. वेळोवेळी मुलांना प्रोत्साहित करा, त्यांच्या चुकांची दुरुस्ती करा, लहान वयात मुले भावनिकदृष्ट्या सक्षम नसतात. त्यामुळे त्यांना अत्यंत समतोलपणे हाताळायला हवे. आजी-आजोबांची यामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे.
दुसऱ्या दिवशी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्रीनाथ देशपांडे उपस्थित होते. ते म्हणाले, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. जीवनात अनेक संधी मिळत असतात. ज्ञानाचे वाटप होणे आवश्यक असून पुस्तकांसोबत मैत्री करा, पुस्तके आपले जीवन बदलू शकतात. तसेच त्यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहनही केले.
तिसऱ्या दिवशी माध्यमिक विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांची पासिंग आऊट परेड झाली. प्रमुख पाहुणे म्हणून स्टॉफ इंडियाचे कार्यकारी संचालक बिपीन चिरमुरे उपस्थित होते. ते म्हणाले, आजचे युग स्पर्धेचे आहे. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून वेळेचा सदुपयोग करा. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सशक्त व्हा.

उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून जुई चंदगडकर हिला पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गतवर्षाच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध विषयांत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. जुईने आपले मनोगत व्यक्त केले. शाळेची माजी पंतप्रधान दिया भाला हिने नूतन पंतप्रधान सुनिधी हलकारे हिला कार्यभार सोपविला. सुनिधीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्या मंजिरी रानडे यांनी विद्यार्थ्यांना सद्वर्तनाची शपथ दिली.
यानंतर पहिल्या दिवशी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य, नाटिका सादर केली. दुसऱ्या दिवशी लोकनृत्यावर आधारित कार्यक्रम झाले. तिसऱ्या दिवशी भारतीय सण या सूत्रावर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. प्राचार्या मंजिरी रानडे यांनी स्वागत करून वार्षिक अहवाल सादर केला. सूत्रसंचालन अंशुमन दागा, क्रांती विचारे, रिजुल पाटील, मन्यु कुलकर्णी, सुनिधी हलकारे, तनिष्का तेंडुलकर यांनी केले.

पाहुण्यांची ओळख दैविक हणबर, खुशी श्रेयकर, अक्षरा पाटील यांनी करून दिली. शरयु जोशी, केया श्रेयकर, हंसिका सैनानी यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे सचिव जगदीश कुंटे, संचालक अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर, गिरीधर रवी शंकर, प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग आणि शिक्षक उपस्थित होते.









