प्रतिनिधी /पणजी
कला अकादमी दर्यासंगमावर लोककला प्रोत्साहन देणाऱया लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून खरेदी आणि विविध कार्यक्रमांसाठी लोकोत्सवाला गोमंतकीयांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यात देशातील विविध राज्याच्या हस्तकला व लोककलांचे प्रतिनिधीत्त्व करणाऱया स्टॉल्सचा समावेश आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड दिसून येते.
लोकोत्सवात असाच एक गोमंतकीय स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, तो म्हणजे स्नेहा वाडकर यांचा स्टॉल. लोकोत्सवात स्नेहा वाडकर यांच्या स्टॉलमध्ये हस्तकला वस्तू, पेटिंगपासून ते गिफ्ट बॉक्सपर्यंत वस्तू मांडण्यात आल्या आहेत. हल्लीच स्नेहा यांनी अशाप्रकाच्या वस्तू तयार करून विक्री करण्यासाठी सुरूवात केली आहे. यासाठी त्यांनी विविध प्रदर्शनात सहभागही घेतला आहे. स्टॉलमध्ये चितारी कलेतून प्रेरित कोस्टर, हँडपेंट केलेली चित्रे, विविध आकाराचे गिफ्ट बॉक्स, कागदाची फुले जी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. याशिवाय पेटिंग्ज, सुंदर कानातली, बॅग्ज, दागिने, पाऊचेस अशा वस्तूंमुळे स्टॉल आकर्षक आणि रंगीबेरंगी दिसून येत आहे. स्टॉलवर खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून कलेचे कौतुक केले जाते. सध्या स्नेहा आपली कला सोशल मीडिया माध्यमावर प्रदर्शित करत आहेत.
लोकोत्सव हा सांस्कृतिक उत्सव असून यातून गोमंतकीय कलेला सादरीकरणाकरिता उत्तम व्यासपीठ मिळत आहे. मी यंदा पहिल्यांदाच लोकोत्सवात सहभागी झाले असून माझ्यासाठी चांगला आणि फलदायी असा अनुभव आहे. लोकोत्सवातील प्रदर्शनामुळे मला एक मोठे प्रदर्शन मिळाले. कारण हे केवळ गोव्यातीलच नव्हे तर गोव्याला भेट देणाऱया पर्यटकानांही आकर्षित ठरत आहे, अशी प्रतिक्रिया स्नेहा वाडकर यांनी व्यक्त केली.
खरेदीबरोबरच याठिकाणी सायंकाळच्यावेळी विविध लोककला प्रकारही सादर केले जातात. त्यात विविध राज्यातील लोककलांचा आनंद लुटण्याची संधी मिळत असल्याने लोकोत्सवात लोकांची झुंबड दिसून येत आहे.









