अमेरिकेतील फ्लोरिडा येथील भूशास्त्रज्ञ रोसिए मूर यांनी एक गंभीर इशारा नुकताच दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जगातील अनेक प्रजातींच्या सापांना आता मानवी मांसाची चट लागली आहे. असुरक्षित परिस्थितीत राहणाऱया मानवांसाठी ही बाब अत्यंत घातक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार हा निष्कर्ष त्यांनी एका अहवालात काढला आहे.
त्यांनी सापांच्या काही प्रजातींवर एव्हरग्लँड्स येथील जंगलांमध्ये प्रदीर्घ संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी या जंगलात वास्तव्यास असणाऱया आणि कोणत्याही परिस्थितीत मानवी वस्तीत न येणाऱया या प्रजाती आता आवर्जून मानवाकडे आकर्षित झाल्या आहेत. जंगलतोड हे त्याचे कारण नाही किंवा या सापांच्या प्रजातींना त्यांचे अधिवास गमवावे लागले आहेत, हे देखील याचे कारण नाही. तर त्यांना मानवी रक्त आणि मांस हे आवडू लागले आहे. त्याच्या शोधात हे साप या जंगलाच्या आसपासच्या मानव वस्त्यांमध्ये अलीकडच्या काळात दिसून येऊ लागले आहेत. घराबाहेर खेळत असणाऱया लहान मुलांना ते लक्ष्य करण्याची शक्मयता जास्त आहे. मानवाचा चावा घेऊन त्याच्या मांसाचा लचका तोडणे आणि रक्त शोषण करणे हे त्यांचे मानव वस्तीत येण्याचे उद्देश आहेत. जंगलांमध्ये त्यांना इतर प्राणी भक्ष्य म्हणून मिळतात, त्याच्यापेक्षा मानवाचे मांस किंवा रक्त वेगळय़ा चवीचे असते, हे आता त्यांच्या लक्षात आल्याने त्यांची अशा प्रकारची वर्तणूक होत आहे. मानवी मांसाची सवय त्यांना कशी लागली? हे अद्यापही गूढ आहे. तसेच एका सापाला लागलेली ही चट अन्य सापांपर्यंत कशी पोहोचली? यावरही संशोधन सुरू आहे. पण काहीही असले तरी मानवाने सावध राहण्याची वेळ आली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. कारण अमेरिकेतील सापांना लागलेली ही सवय जगातील इतर प्रजातींच्या सापांनाही लागू शकते. दाट लोकवस्तीतील मानवांना याचा फारसा धोका नाही. कारण अशा वस्तींमध्ये साप सुरक्षेच्या भयास्तव येत नाहीत. पण ज्या ठिकाणी तुरळक मानव वस्ती आहे आणि ती जंगलांच्याजवळ आहे, तेथे हा धोका अधिक संभवतो, असे त्यांना आढळले आहे.









