औषध म्हणूनही होतो वापर
चीनमध्ये एका विशेष प्रकारचे मद्य ख्रिस्तपूर्व काळापासून तयार केले जात आहेत. यात जिवंत किंवा मृत साप धान्याने भरलेल्या जारमध्ये कित्येक महिन्यांसाठी ठेवला जातो. यातून तयार होणाऱ्या मद्याचा वापर सर्वसाधारणपणे चिनी पारंपरिक चिकित्सेत मोठ्या प्रमाणात केला जातो. याला स्नेक वाइन म्हटले जाते. चिनी भाषेत याला पिनयिन तसेच व्हिएतनामी भाषेत खमेर म्हटले जाते. हे अल्कोहोलिक मादक पेय आहे. या पेयाला पहिल्यांदा ख्रिस्तपूर्व काळात पश्चिम झोऊ वंशादरम्यान तयार करण्यात आले होते.

प्रामुख्याने या मद्याला वैद्यकीय स्वरुपात अधिक उपयुक्त मानले जाते. चीनसोबत याची निर्मिती उत्तर कोरिया, व्हिएतनाम, ओकिनावा (जपान), लाओस, थायलंड, कंबोडिया आणि दक्षिण पूर्व आशियात होते. आणखी अनेक देशांमध्ये देखील जुन्या काळात याच्या निर्मितीची प्रथा राहिली आहे. किड्याने चावा घेतल्यास आणि गाठ तयार झाल्यास उपचाराकरता याचा वापर केला जातो. याचबरोबर कुष्ठरोग, केस गळती, त्वचा कोरडी होण्यासमवेत अनेक आजारांच्या उपचारात पारंपरिक चिकित्सा म्हणून याचा वापर करण्यात येतो. तसेच स्नेक वाइनला टॉनिक मानले जाते.
कंबोडिया, चीन, जपान, कोरिया, लाओस, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाम यासारख्या देशांमध्ये हे स्नेक वाइन सहजपणे उपलब्ध होते. एका सापाला जारमध्ये ठेवून त्यात तांदूळ किंवा गव्हाची दारू टाकली जाते. यात मद्य आणि फॉर्मलडेहाइडन देखील मिसळले जाते. साप हा व्हिएतनामी संस्कृतीत ‘पौरुषत्वाचे’ प्रतीक आहे. तेथे स्नेक वाइन अत्यंत लोकप्रिय आहे.
स्नेक वाइनमध्ये एनाल्जेसिक (वेदनाशामक) आणि सूजनिवारण गुणधर्म असल्याचे आधुनिक अध्ययनातून समोर आले आहे. तांदळाच्या दारूत मिसळण्यात आलेले इथेनॉल सापाच्या विषाचा प्रभाव संपुष्टात आणत असल्याने ते पिण्यासाठी अत्यंत सुरक्षित आहे. चीनमधील बाजारपेठा आणि पारंपरिक स्नेक रेस्टॉरंटमध्ये स्नेक वाइन आढळते. याला तेथे से-वोंग नावाने ओळखले जाते. तसेच चीनमध्ये सापाचा आहारातील समावेश फारच जुना आहे.









