जगातील अनेक देशांमध्ये अत्यंत अजब प्रकारची आणि आश्चर्यकारक रेस्टॉरंट्स आहेत. कडाक्मयाच्या थंडीच्या प्रदेशात आल्प्स पर्वतांच्या रांगांमध्ये केवळ बर्फापासून बनविलेली रेस्टॉरंट्स आहेत. काही रेस्टॉरंट्स झाडाच्या फांद्या आणि नैसर्गिक साधनसामग्रीने बनविलेली आहेत. जपानमध्ये एक रेस्टॉरंट असे आहे की जेथे आपण जेवत असताना भीतीदायक वातावरण निर्माण केले जाते. या हॉटेलात वेटर्ससुद्धा भुतासारखा पोशाख करून आपल्याला वाढायला येतात. पण अशी रेस्टॉरंट्सही फिकी पडावीत असे एक स्थान मलेशिया देशात आहे.
या रेस्टॉरंटमध्ये चक्क जिवंत साप, विंचू आणि आपण ज्यांच्याजवळ जाणेही टाळतो असे अनेक किटक पाळण्यात आलेले आहेत. जे लोक प्राणीप्रेमी आहेत, त्यांच्यासाठी या खास रेस्टॉरंटची निर्मिती करण्यात आली आहे. या रेस्टॉरंटमध्ये ग्राहक त्यांचा आहार घेत असताना हे भीतीदायक प्राणी त्यांच्या अगदी जवळ येतात. ज्याप्रमाणे आपण घरच्या कुत्र्या-मांजरांना जवळ घेतो, तसे हे प्राणीप्रेमी साप, विंचू, पाली, मोठे अजगर इत्यादींना जवळ घेऊन आपला खाण्याचा कार्यक्रम उरकतात. हे सर्व प्राणी माणसाळलेले आहेत. तथापि, त्यांच्यापासून धोका होण्याची शक्मयताही पूर्णतः नाकारण्यात आलेली नाही. या रेस्टॉरंटमध्ये काही दुर्लभ प्रजातींचे प्राणीही ठेवण्यात आलेले आहेत. त्यात बिअर्डेड ड्रगन, लेपर्ड गेको, कॉर्नस्नेक इत्यादी जीवही आहेत. लोक त्यांना पाहण्याचा आनंद अनुभवत येथे भोजन करतात.
या प्राण्यांना हातात घेऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचीही सोय आहे. अनेक प्राणीप्रेमी आपल्या मुलांना घेऊनही येथे येतात. या रेस्टॉरंटमधील कर्मचारीवर्ग विशेष प्रशिक्षित असून तो या प्राण्यांना सरावलेला आहे. दिवसेंदिवस या रेस्टॉरंटमधील गर्दी वाढताना दिसून येते. या रेस्टॉरंटचा खर्चही मोठा आहे. कारण हा सर्व प्राणीवर्ग सांभाळणे हे अत्यंत खर्चिक काम आहे. या प्राण्यांना आपण इतरत्र शिवण्याचा विचारही करू शकत नाही. असे प्राणी येथे सहजगत्या हाताळता येतात. यामुळे सर्वसामान्य लोकांना अशा प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण होते आणि या प्राण्यांची हत्या करण्याच्या विचारापासून ते दूर जातात. म्हणून हे रेस्टॉरंट निर्माण करण्यात आले आहे, असे त्याच्या मालकाचे म्हणणे आहे.









