अबकारी पोलिसांकडून 30 लाखांचा मुद्देमाल जप्त : हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ कारवाई
बेळगाव : गोवा बनावटीची दारु वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या दारु तस्करी करणाऱ्यांनी लढविल्या आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये प्लाऊडमधून दारु वाहतूक करण्यात आली होती. त्यानंतर आता चक्क वीज ट्रान्स्फॉर्मर वाहतूक करत असल्याचे दाखवत त्यामधून लाखो रुपयांची दारु वाहतूक करताना अबकारी पोलिसांनी धाड टाकून पकडले आहे. एका चित्रपटातील तस्करी करणाऱ्या प्रसंगाप्रमाणेच हा प्रकार घडला आहे. यामुळे सारेच अचंबित झाले आहेत. गोवा येथून तेलंगणाकडे गोवा बनावटीची दारु वाहतूक करण्यात येत होती. याची माहिती अबकारी विभागाला मिळाल्यानंतर हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ वाहनांची झडती घेण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील बिड जिल्ह्यातील ट्रक क्रमांक एमएच 43 वाय 2976 मधून विजेच्या ट्रॉन्स्फॉर्मरमध्ये दारुसाठा ठेवून ती वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांना ट्रॉन्स्फॉर्मर असल्याचे दिसले. मात्र संशय आल्याने संपूर्ण तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची लाखो रुपयांची दारु आढळून आली.
मोठी टोळी कार्यरत
गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दारुसाठा गोव्यामधून इतर राज्यांना वाहतूक होत असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली होती. एक मोठी टोळी कार्यरत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अबकारी खात्याला गुप्त यंत्रणेकडून गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारु बेळगावमधून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानतंर अबकारी खात्याचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त वनजाक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी अधिक्षक विजयकुमार हिरेमठ, उपअधिक्षक रवी मुरगोड, निरीक्षक रवींद्र होसळ्ळी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ट्रक चालक श्रीराम सुधाकर परडे (रा. मुंबई) याला अटक करण्यात आली. एकूण ट्रकमधील 250 बॉक्स दारु जप्त करण्यात आली आहे. याची 10 लाख रुपये किंमतीची दारु आणि 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अबकारी पोलिसांना यश आले आहे.
महिन्यापूर्वी प्लाऊडमधून झाली होती वाहतूक
गोवा बनावटीची दारु प्लाऊड वाहतूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार महिन्यापूर्वी उघडकीस आला होता. त्यानंतर आता विद्युत ट्रॉन्स्फॉर्मर वाहतूक करत असल्याचे दाखवत त्यामधून दारुसाठा नेण्यात येत होता. या प्रकारामुळे अबकारी पोलिसही चक्रावले आहेत. अशा प्रकारे जर चोरटे वाहतूक करत असतील तर त्याला आवार कसा घालायचा? असा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. सदर दारुसाठा हा तेलंगणाला जात होता. सध्या तेथील निवडणुका जाहीर झाल्यामुळे ही दारु वाहतूक होत असल्याचा संशय अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ यांनी सांगितले.
ट्रकलाही अत्याधुनिक तंत्रज्ञान
वाहन कोठे आहे हे समजण्यासाठी आता वाहनांना जीपीएस बसविले जात आहे. सरकारी वाहनांना हे जीपीएस बसविण्यावर भर दिला जात आहे. मात्र दारु वाहतूक करणाऱ्या अशा वाहनांनाही जीपीएस बसविल्याची धक्कादायक माहिती या कारवाईत उघडकीस आली आहे. सदर ट्रक जप्त केल्यानंतर ती सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही अंतरावर जाताच तो ट्रक बंद पडला. त्यानंतर त्याची तपासणी केली असता जीपीएस बसविल्याचे आढळून आले. त्यामुळे मॉनेर्टिंग करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ट्रक बंद पडल्यामुळे त्यानंतर एका टेक्नीशियन व मेकॅनिकलला बोलावून ट्रक सुरू करण्यात आला. अशा प्रकारे चोरटेही जर वाहनांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असतील तर भविष्यात ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.









