राजस्थानातील घटना : टोलनाक्यावर इनोव्हाला बोलेरोची धडक
भोपाळ
राजस्थानात चित्तोरगडमधील उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या मध्यप्रदेशच्या नीमच सेंट्रल नार्कोटिक्स ब्युरोच्या पथकावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. तस्करांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरोच्या टीमचा एक अधिकारी जखमी झाला. तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाच्या गाडीला तस्करांनी जोरदार धडक देऊन उडविण्याचा प्रयत्न केला. या धडकेत ब्युरोच्या वाहनात बसलेले दोन अधिकारीही जखमी झाले. मात्र, असे असतानाही पथकाने धाडस दाखवत एका तस्कराला पकडले. तर उर्वरित तस्कर घटनास्थळावरून पळून गेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नार्कोटिक्स ब्युरोच्या पथकाने तस्करांच्या इनोव्हा वाहनातून 345 किलोहून अधिक अमली पदार्थ पावडर जप्त केली आहे.
चित्तोरगडमधील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नारायण पुरा टोल प्लाझा येथे ही घटना घडली. चित्तोरगडमधील मंगळवाड येथून बारमेर येथे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. वाहनांच्या ओळखीच्या आधारे गुजरात पासिंग क्रमांक असलेले वाहन येताच पथकाने आपले वाहन टोलनाक्यावरील बॅरिकेडजवळ तस्करांच्या वाहनासमोर उभे केले. यावर तस्करांनी भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारला धडक दिली आणि गाडीतून खाली उतरताच तस्करांनी गोळीबार सुरू केला, असे सांगण्यात आले.









