वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची उपकर्णधार आणि सलामीची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधनाने आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे तर अष्टपैलू दिप्ती शर्माचे मानांकन वधारले आहे.
अलिकडेच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत स्मृती मानधनाने दोन शतके झळकविली. पण ऑस्ट्रेलियन महिला संघाने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारताला विजयासाठी 400 पेक्षा अधिक धावांचे आव्हान दिले होते. पण मानधनाने शतकी खेळी केली तसेच कर्णधार हरमनप्रित कौर आणि दिप्ती शर्मा यांनी अर्धशतके झळकविली पण भारताला हा सामना थोड्या धावांच्या फरकाने गमवावा लागला. स्मृती मानधना आता महिलांच्या ताज्या मानांकन यादीत 818 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
भारताची अष्टपैलू दिप्ती शर्माचे मानांकन दोन अंकांनी वधारले असून आता ती या यादीत पाचव्या स्थानावर आहे. दिप्ती शर्मा 651 मानांकन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तसेच द.आफ्रिकेची वेगवान गोलंदाज खाका हिने 548 मानांकन गुणांसह 15 वे स्थान मिळविले आहे. भारतीय संघातील क्रांती गौडने 39 वे स्थान मिळविले आहे. या गोलंदाजांच्या यादीमध्ये इंग्लंडची सोफी इक्लेस्टोन 795 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. द. आफ्रिका महिला संघातील फलंदाज ब्रिट्सने पाकविरुद्धच्या मालिकेत पाठोपाठ नाबाद शतके झळकविल्याने ती आता या मानांकन यादीत 669 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी 727 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 30 सप्टेंबरपासून गुवाहाटी येथे आयसीसीच्या महिलांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये हरमनप्रित कौरचा भारतीय संघ आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी आतापासूनच जोरदार सराव करीत आहे.









