वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या महिलांच्या ताज्या वनडे फलंदाजांच्या मानांकनातील भारताच्या स्मृती मानधनाचे अग्रस्थान कायम राहिले आहे. दरम्यान सध्या भारतात सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत मानधनाला अधिक धावा जमविता आल्या नाहीत. पण ताज्या मानांकनात तिने 791 मानांकन गुणांसह आपले अग्रस्थान कायम राखले आहे.
फलंदाजांच्या मानांकनात इंग्लंडची नॅट सिव्हर ब्रंट 731 मानांकन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या मानांकनातील पहिल्या दोन फलंदाजांमध्ये 60 गुणांचा फरक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत मानधनाने दर्जेदार फलंदाजी केली होती. मात्र आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मानधनाने लंकेविरुद्ध केवळ 8 धावा तर पाकविरुद्ध 23 धावा जमविल्या होत्या. या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी 713 मानांकन गुणांसह तिसऱ्या, द. आफ्रिकेची ब्रिट्स 706 मानांकन गुणांसह चौथ्या आणि ऑस्ट्रेलियाची गार्डनर 697 मानांकन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. आयसीसीच्या महिलांच्या वनडे गोलंदाजांच्या ताझ्या मानांकन यादीत इंग्लंडची सोफी इक्लेस्टोन 792 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर भारताची दिप्ती शर्मा 640 मानांकन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.









