वृत्तसंस्था/दुबई
आयसीसीतर्फे प्रत्येक महिना अखेरीस सर्वोत्तम पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंची निवड त्यांच्या कामगिरीचा आढावा घेत केली जाते. आता ऑक्टोबर महिन्यातील महिलांच्या सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाची शिफारस करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्मृती मानधनाच्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला पहिल्यांदाच जेतेपद मिळविता आले. ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कार शर्यतीमध्ये भारताची स्मृती मानधना, द. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड तसेच ऑस्ट्रेलियाची अॅश्ले गार्डनर यांच्यात खरी चुरस निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मानधनाने 80 धावांची खेळी केल्यानंतर इंग्लंडविरुद्ध तिने 88 धावा फटकाविल्या होत्या.
मात्र या दोन्ही सामन्यात भारताला हार पत्करावी लागली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या प्राथमिक फेरीतील शेवटच्या सामन्यात मानधनाने 109 धावांची शतकी खेळी करताना प्रतीका रावलसमवेत सलामीच्या गड्यासाठी 212 धावांची शतकी भागिदारी केली. या कामगिरीमुळे भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळविता आले आणि न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आले. द. आफ्रिका विरुद्धच्या अंतिम सामन्यात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या सलामीच्या जोडीने शतकी भागिदारी केली होती. द. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा जमविल्या आहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने द. आफ्रिकेचा 10 गड्यांनी पराभव केला होता. त्यानंतर प्राथमिक फेरीतील भारताविरुद्धच्या सामन्यात वोल्वार्डने 70 धावा झळकविल्या होत्या.









