वृत्तसंस्था/पुणे
आगामी होणाऱ्या महिलांच्या पहिल्या महाराष्ट्र प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जेट्स संघाची घोषणा करण्यात आली असून भारतीय महिला संघातील उपकर्णधार स्मृती मानधनाची या संघातील आयकॉन खेळाडू म्हणून घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात पहिली महिलांची महाराष्ट्र प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा घेण्याचे ठरविले होते. पण याच कालावधीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा द. आफ्रिका दौरा निश्चित झाल्याने ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती. आता यावेळी ही स्पर्धा निश्चितपणे घेतली जाणार असून स्पर्धेची तारीख व वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
गेली दोन वर्षे रत्नागिरी जेट्स पुरुष संघाने महाराष्ट्र प्रिमीयर लीग पुरुषांची टी-20 स्पर्धा जिंकली आहे. आता महिलांच्या ही स्पर्धा ख्घ्sळविली जाणार आहे. आगामी तीन हंगामासाठी रत्नागिरी जेट्स संघांनी स्मृती मानधनाची आयकॉन खेळाडू म्हणून घोषणा केली आहे. जागतिक महिला क्रिकेटमध्ये स्मृती मानधना ही आक्रमक फलंदाज म्हणून ओळखली जाते. 2023-24 च्या क्रिकेट हंगामात बीसीसीआयने स्मृती मानधनाची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली होती. 2025 च्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या खेळाडूंच्या लिलावामध्ये स्मृती मानधनाला मोठ्या रक्कमेची बोली लावण्यात आली होती. सदर स्पर्धा मे अखेरीस सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









