वृत्तसंस्था/ दुबई
शैलीदार सलामीवीर स्मृती मानधना आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत जागतिक अव्वल स्थान पुन्हा मिळवण्याच्या जवळ पोहोचली आहे. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या तिरंगी स्पर्धेतील भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर तिने एका स्थानाने बढती मिळवत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
मागील खेपेला म्हणजे 2019 मध्ये एकदिवसीय फलंदाजांत अव्वल स्थान मिळवणाऱ्या मानधनाने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या अलीकडील सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तिने पाच डावांमध्ये 264 धावा केल्या आणि स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. श्रीलंकेविऊद्धच्या अंतिम सामन्यात 101 चेंडूंत 116 धावा करणारी मानधना अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टपासून फक्त 11 रेटिंग गुणांनी दूर आहे. लॉराने तिरंगी मालिकेत फक्त 86 धावा केल्या.
श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापटू हिनेही आघाडीच्या 10 फलंदाजांत स्थान मिळवले आहे. तिने सदर स्पर्धेत 139 धावा केल्या आणि ती दोन स्थानांनी पुढे सरकून सातव्या स्थानावर पोहोचली आहे, तर जेमिमा रॉड्रिग्ज पाच स्थानांनी पुढे सरकून 15 व्या स्थानावर आणि दक्षिण आफ्रिकेची क्लो ट्रायॉन नऊ स्थानांनी पुढे सरकून 18 व्या स्थानावर पोहोचली आहे.
भारताची फिरकी गोलंदाज स्नेह राणा हिला श्रीलंकेत मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले होती आणि गोलंदाजांच्या यादीत मोठी बढती मिळविणाऱ्यांमध्ये तिचा समावेश राहिला आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अजूनही आघाडीवर असून दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज नादिन डी क्लार्क हिनेही एका स्थानाने प्रगती करत या यादीत 24 व्या स्थानावर झेप घेतली आहे, तर राणाने तिरंगी मालिकेत घेतलेल्या 15 बळींच्या जोरावर 4 स्थानांनी प्रगती करत 34 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या अॅश गार्डनरने एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाची अष्टपैलू खेळाडू म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे, तर भारताची दीप्ती शर्मा श्रीलंकेतील काही प्रभावी प्रयत्नांनंतर एका स्थानाने प्रगती करत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. ट्रायॉन (तीन स्थानांनी पुढे जाऊन 11 व्या स्थानावर) आणि डी क्लार्क (चार स्थानांनी पुढे जाऊन 12 व्या स्थानावर) यांनीही लक्षणीय प्रगती केली आहे.









