वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे प्रत्येक वषी पुरुष आणि महिलांच्या विभागात वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेत सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड केली जाते. महिलांच्या विभागात आयसीसीच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या यादीमध्ये स्मृती मानधना ही एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. पुरुष विभागात भारताच्या एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही.
आयसीसीच्या महिलांच्या या सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराच्या शर्यतीमध्ये आता भारताची स्मृती मानधना, इंग्लंडची नॅट स्किव्हेर, न्यूझीलंडची ऍमेलिया केर आणि ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाज बेथ मुनी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पुरुष विभागात पाकचा कर्णधार बाबर आझम, इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा आणि न्यूझीलंडचा नवा कसोटी कर्णधार टीम साऊदी यांच्यात या पुरस्कारासाठी चुरस राहील. दरम्यान, पुरुष विभागात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आघाडीवर असल्याचे समजते.

2022 च्या क्रिकेट हंगामातील कसोटी क्रिकेट प्रकारात सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी इंग्लंडचे बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडा यांचा समावेश आहे. आयसीसीच्या या विविध पुरस्कारांसाठी पुढील आठवडय़ापासून क्रिकेटशौकिनांच्या मतदानाला प्रारंभ होईल. आयसीसीतर्फे या पुरस्कारासाठी खास व्होटिंग (मतदान) अकादमीची स्थापना करण्यात आली असून या अकादमीत क्रिकेट प्रसार माध्यमातील सदस्यांचा समावेश आहे. 2021 च्या क्रिकेट हंगामात भारताच्या स्मृती मानधनाने आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार तसेच रॅचेल फ्लिंट चषक पटकाविला होता. आता ती सलग दुसऱया वषी पुन्हा या पुरस्काराच्या शर्यतीत आघाडीवर आहे. क्रिकेटच्या टी-20 प्रकारात तिने चालू वषीच्या क्रिकेट हंगामात 594 धावा जमविल्या असून वनडे प्रकारात तिने 696 धावा केल्या आहेत. भारतातर्फे ती वनडे क्रिकेट प्रकारात सर्वोच्च धावा नोंदविणारी दुसरी फलंदाज आहे.
आयसीसीच्या सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेट प्रकारातील पुरस्कारासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा आघाडीवर असल्याचे समजते. इंग्लंडला ऍशेस मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. तसेच त्यानंतरच्या मालिकेत विंडीजविरुद्धही हार पत्करावी लागली. त्यामुळे रुटला आपल्या कप्तानपदाचा राजीनामा द्यावा लागला. इंग्लंडच्या निवड समितीने बेन स्टोक्सकडे कप्तानपदाची जबाबदारी तसेच ब्रेन्डॉन मेकॉलमकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. स्टोक्सकडे नेतृत्व सोपविण्यात आल्यानंतर इंग्लंड संघाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. इंग्लंडने स्टोक्सच्या नेतृत्वाखाली 10 पैकी 9 कसोटी सामने जिंकले आहेत. या सामन्यांमध्ये स्टोक्सने 2 शतकांसह 870 धावा जमविल्या असून गोलंदाजीत त्याने 26 गडी बाद केले आहेत. कसोटी क्रिकेट प्रकारात स्टोक्स सध्या आघाडीचा अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टोक्सने वनडे तसेच टी-20 क्रिकेटच्या प्रकारातून यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली होती. टी-20 प्रकारात त्याने नऊ सामन्यांतून 143 धावा तसेच 7 बळी मिळविले.
आयसीसी 2022 विविध पुरस्कारासाठी क्रिकेटपटूंची यादी
सर गारफिल्ड सोबर्स चषक- आयसीसी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूसाठी- बाबर आझम (पाक), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), टीम साऊदी (न्यूझीलंड), बेन स्टोक्स (इंग्लंड).
रॅचेल फ्लिंट चषक- आयसीसी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी- ऍमेलिया केर (न्यूझीलंड), स्मृती मानधना (भारत), बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया), नॅट स्किव्हेर (इंग्लंड).
आयसीसी सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेट पुरस्कार- जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), रबाडा (दक्षिण आफ्रिका), बेन स्टोक्स (इंग्लंड).
आयसीसी सर्वोत्तम वनडे क्रिकेटमधील पुरुष क्रिकेट पुरस्कार- बाबर आझम (पाक), शाय हॉप (विंडीज), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), ऍडॅम झम्पा (ऑस्ट्रेलिया).
आयसीसी सर्वोत्तम वनडे महिला क्रिकेट पुरस्कार- ऍलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), शबनिम इस्माईल (द. आफ्रिका), ऍमेलिया केर (न्यूझीलंड), नॅट स्किव्हेर (इंग्लंड).
आयसीसी सर्वोत्तम टी-20 पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार- सॅम करन (इंग्लंड), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), मोहम्मद रिझवान (पाक), सूर्यकुमार यादव (भारत).
आयसीसी सर्वोत्तम महिला टी-20 क्रिकेटपटू पुरस्कार- निदा दार (पाक), सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड), स्मृती मानधना (भारत) आणि ताहिला मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया).
आयसीसी वर्षभरातील सर्वोत्तम पुरुष इमर्जिंग क्रिकेटपटू पुरस्कार- फिन ऍलेन (न्यूझीलंड), मार्को जेन्सन (द. आफ्रिका), अर्शदीप सिंग (भारत), इब्राहिम झेद्रान (अफगाण).
आयसीसी वर्षभरातील सर्वोत्तम महिला इमर्जिंग क्रिकेटपटू पुरस्कार- यास्तिका भाटिया (भारत), डार्सी ब्राऊन (ऑस्ट्रेलिया), ऍलिसी कॅप्से (इंग्लंड), रेणुकासिंग ठाकुर (भारत).









