वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीतर्फे मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या महिला वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने पुन्हा अग्रस्थान काबीज केले आहे.
ऑस्ट्रेलियन महिला संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून उभय संघात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात मानधनाने अर्धशतक झळकविल्याने तिने या ताज्या मानांकन यादीत पहिले स्थान मिळविले आहे. या सामन्यात मानधनाने 63 चेंडूत 58 धावा जमविल्या. पण भारताला हा सामना गमवावा लागला. 30 सप्टेंबरपासून भारत आणि लंका यांच्या संयुक्त यजमानपदाने आयसीसीची महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे.
मानधनाला या अर्धशतकामुळे सात रेटींग गुण मिळाल्याने तिने इंग्लंडची नॅट सिव्हेर ब्रंटला 4 गुणांनी पिछाडीवर टाकले. आता मानधना 735 मानांकन गुणांसह पहिल्या तर नॅट सिव्हेर ब्रंट 731 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 2019 साली मानधनाने या मानांकनात पहिल्यांदा अग्रस्थान मिळविले होते. वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची प्रतिका रावल 42 व्या, हर्लिन देवोल 43 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी पाचव्या स्थानावर आहे. वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची किम गॅरेथ आणि अॅलेना किंग यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळविले असून भारताची स्नेह राणा 13 व्या स्थानावर आहे. इंग्लंडची इक्लेस्टोनने आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे.









