शेखर कपूर यांचाही समावेश : संस्कृती मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान संग्रहालय तसेच पुस्तकालयाच्या सोसायटी आणि कार्यकारी परिषदेची पुनर्रचना करण्यात आली आहे. संस्थेच्या सोसायटीत अनेक नव्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधानांचे माजी सचिव नृपेंद्र मिश्रा यांना सोसायटीचे अध्यक्ष म्हणून पाच वर्षांचा आणखी एक कार्यकाळ मिळाला आहे. नव्या सदस्यांच्या स्वरुपात माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार, सेवानिवृत्त जनरल सैयद अता हसनैन, चित्रपट निर्माते शेखर कपूर आणि वासुदेव कामत यांना सामील करण्यात आले आहे.
याचबरोबर बाबरी ढांचाच्या उत्खनन टीमचे सदस्य राहिलेले पुरातत्व तज्ञ के.के. मोहम्मद आणि राष्ट्रीय संग्रहालयाचे वर्तमान प्रमुख बी.आर. मणि यांनाही सोसायटीत सामील करण्यात आले आहे. तर रिजवान कादरी यांना सोसायटीचे सदस्य म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
परिषदेचा कार्यकाळ 5 वर्षांचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपाध्यक्ष असलेल्या कार्यकारी परिषदेचा विस्तार झाला आहे. यात पूर्वी 29 सदस्य होते, ही संख्या आता वाढून 34 झाली आहे. तर परिषदेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असणार आहे.
अनुराग ठाकूर यांना मिळाले नाही स्थान
नव्या परिषदेत काही जणांना पुन्हा स्थान मिळाले नाही, यात माजी केंद्र्रीय मंत्री अनुराग ठाकूर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अध्यक्ष राम बहादुर राय आणि पत्रकार रजत शर्मा यांचा समावेश आहे. तर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या निर्मितीत भूमिका बजावणारे शिक्षणतज्ञ चामू कृष्ण शास्त्राr यांना परिषदेत सामील करण्यात आले आहे.









