वृत्तसंस्था/ दुबई
मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 मानांकनात भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना तसेच अष्टपैलु दिप्ती शर्माने अनुक्रमे फलंदाज आणि गोलंदाजांच्या मानांकनात आपले तिसरे स्थान कायम राखले आहे.
आयसीसीच्या या ताज्या मानांकन यादीत स्मृती मानधना वगळता भारताच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळविता आलेले नाही. फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत हरमनप्रीत कौर 11 व्या तर जेमीमा रॉड्रिग्ज 15 व्या स्थानावर आहेत. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाची ताहिला मॅकग्रा दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध सध्या सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने अनुक्रमे नाबाद 75 आणि 70 धावा झळकविल्याने तिने आपले आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले आहे. ऑस्ट्रेलियाची लिचफिल्ड 22 व्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या यादीत अष्टपैलु अॅमेली केरचे मानांकन दोन अंकांनी वधारले आहे.
आयसीसी महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या यादीत भारताच्या दिप्ती शर्माने आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. इंग्लंडची सोफी इक्लेस्टोन पहिल्या तर पाकची साधीया इक्बाल दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलु अॅनाबेल सदरलँडने 2024 साली दोनवेळा आयसीसीच्या सर्वोत्तम महिला मासिक पुरस्कार मिळविला आहे. आता सदरलँड टी-20 च्या गोलंदाजांच्या मानांकन यादीत चौथ्या स्थानावर आहे. विंडीजची अष्टपैलु हेली मॅथ्युजने टी-20 अष्टपैलुंच्या मानांकन यादीत 18 व्या स्थानावर तर सदरलँडने 21 व्या स्थानावर झेप घेतली आहे.









