फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सातासमुद्रापलीकडे फार मोठे घनदाट अरण्य होतं. त्या अरण्याच्या पलीकडे एक मोठी जादुई नगरी होती. अतिशय चित्र विचित्र अक्राळविक्राळ राक्षसांनी ती नगरी गजबजलेली होती. ह्या राक्षसांना एक वेगळे वरदान होते. एखादा राक्षस मेला की त्याच्या बदल्यात शंभर राक्षस निर्माण व्हायचे आणि ते आणखीन जोर जोरात दुसऱ्यांना त्रास द्यायचे. देवांना पण कळेना काय करावे ते. तपश्चर्या करून वर मिळवलेल्या या राक्षसांचा त्रास सुरुच होता. शेवटी विष्णुंनीच या राक्षसांना अद्दल घडवायची ठरवलं. त्यांनी एक दिवस त्या जंगलात जाऊन तिथे एक जाहिरात लावली. ज्यांना कुणाला जगाचं राज्य हवं असेल त्यांनी मला भेटावे. प्रत्येक जण एकमेकांना ढकलू लागला आणि मारू लागला पण मारण्यामुळे शंभर पटीने राक्षस पुन्हा उभे राहू लागले त्यांच्या या मारामारीत. एक धुम्रवर्ण नावाचा हुशार राक्षस होता. त्याच्या जेव्हा हे लक्षात आलं की दुसऱ्या राक्षसाला मारलं तर हजारो निर्माण होतात. त्यापेक्षा आपण गुपचूप वेशांतर करून ह्या जाहिरातीतल्या माणसाला भेटायला जाऊ. हा धुम्रवर्ण राक्षस प्रत्येक मिनिटाला आपला आकार बदलायचा. लहान आकार, मोठा आकार, भयंकर आकार असे कोणतेही आकार बदलून तो कुठेही फिरत असायचा. तसंच करून तो विष्णूपर्यंत आला. आणि त्यांनी सांगितलं की मला हे साम्राज्य पाहिजे. त्या बदल्यात विष्णू सांगतील ते काम मात्र करायचं. समुद्रातले जे पाणी आहे ते सगळं पाणी वर नेऊन स्वर्गातल्या झाडांना घालायचं. म्हणजे काय जिथे जिथे पाणी पडेल तिथे तिथे स्वर्ग निर्माण करायचा. राक्षसाला वाटलं हे तर एका मिनिटाचे काम. आपण आपला आकार मोठा करू सगळं पाणी घेऊ आणि वर नेऊन टाकू. एवढीच गोष्ट. झालं धुम्रवर्णानी आपल्या ओंजळीत आणि मोठ्या मोठ्या पिशव्यांमध्ये पाणी घ्यायचा प्रयत्न केला. पण काही केल्या समुद्राचे पाणी संपेचना आणि मग तो कंटाळला. हे करता करता तो त्याचे आकार बदलत होता. त्याचं वजन कमी करत होता. जास्त करत होता. या सगळ्यामध्ये हा धुम्रवर्ण अक्षरश: थकून गेला. त्याचे हळूहळू आकार बदलत बदलत त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. धुम्रवर्ण रंगाने पांढराच असल्यामुळे हे सगळे तुकडे बारीक बारीक कण होऊन तरंगायला लागले. जाता जाता समुद्रातले पाणी घ्यायचा ते प्रयत्न करू लागले आणि पाणी आपल्या मुठीत घेऊन वर जाऊ लागले. त्यांना स्वर्ग काही सापडत नव्हता. हे कण हळूहळू छोटे-छोटे एकत्र झाले आणि कापसाच्या पुंजक्यासारखे दिसू लागले. कापसाच्या पुंजक्यामध्ये पाणी एकत्र आलं, दोन कापसाचे पुंजके एकमेकांसमोर आले की ते काळे दिसायचे. खरं म्हणजे मुळात ते पांढरेच पण ह्या मेघांना मात्र इकडे तिकडे हळूहळू हलकेपणाने फिरता येऊ लागले. फिरता फिरता त्यांच्या हातातलं पाणी जेव्हा जड होऊ लागलं त्या वेळेला वारा त्यांच्याशी खेळ खेळायला यायचा आणि एकमेकांच्या अवतीभोवती त्या ढगांना आदळायचा. ते आदळल्यानंतर हे सगळं पाणी त्यांच्या मुठीतनं निसटायचं आणि खाली जमिनीवर पडायचं.
आता हा नित्याचाच कार्यक्रम सुरू झाला. हे पाणी जिथे पडायचं त्या ठिकाणी सर्व परिसर हिरवागार व्हायचा. म्हणजे सर्वत्र स्वर्गच निर्माण व्हायचा. त्यालाही कल्पना आवडली आणि त्यांनी आपला आकार कापसाचाच ठेवला. हे कापसाचे ढग अव्याहतपणे समुद्रावर येतात आणि पाण्याची वाफ करून घेऊन वर जातात. तेच आपल्याला पावसाच्या रूपात मिळतात आणि पृथ्वीचा स्वर्ग बनतो. हे काम करणारा धुम्रवर्ण आजही आपल्याला ढगांच्या रुपात वरती आकाशामध्ये भेटतो.








